नांदेड(प्रतिनिधी)-बेघर पत्रकारांना 83 लाख 94 हजार 880 रुपयांच्या वार्षिक भाडेपट्टीवर दोन एकर जागा देण्यात आली होती असे एक पत्र संचिकेत प्राप्त झाले आहे. या पत्रावर नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेतील नगर रचना विभागाचे उपायुक्त यांची स्वाक्षरी आहे. पण या संचिकेमध्ये हे पैसे वसुल केले गेले काय? याचा कांही उल्लेख मात्र नाही. अर्थात फुकटातच नांदेडच्या सर्वसामान्य माणसाच्या मालकीची जागा तथाकथील पत्रकार सहवास गृहनिर्माण संस्था वापर असल्याचे यावरुन जाणवते.
पत्रकार सहवास सोसायटी आणि बहुभाषिक पत्रकार संघ यांच्या वादातून अखेर ही जागा आपल्या पारड्यात पाडण्यात पत्रकार सहवास गृहनिर्माण संस्थेला यश आले. यासाठी या जागेचा ताबा महानगरपालिके होण्याअगोदरच बेघर पत्रकारांना देण्यात आला होता. बहुभाषिक पत्रकार गृहनिर्माण संस्थेवर पत्रकार सहवास गृहनिर्माण संस्थेने कुरघोडी केल्याचे या संचिकेत दिसते. या संचिकेमध्ये ही जागा ज्याचा ताबा पत्रकारांनी अगोदरच घेतला होता. तेथे पत्रकार नसलेली मंडळी आपले घर बांधत आहे असे सांगत नांदेड महानगर बहुभाषिक पत्रकार संघाने उपोषणपण केले होते. त्यावेळी गरजू पत्रकारांना त्या जागेवरील भुखंड मिळावेत अशी अपेक्षा महानगर बहुभाषिक पत्रकार संघाला होती. त्यावेळी सन 2003 मध्ये बहुभाषिक पत्रकार संघाने दिलेल्या निवेदनात ही लिज आठ वर्षाचीच होती ती संपली आहे. कारण जमीनीचा ताबा घेणाऱ्यांनी पैसेच भरलेले नव्हते. तरीपण महानगरपालिका झाल्यानंतर ही जागा पुन्हा एकदा त्यांच्या बेघर पत्रकारांच्या ताब्यात द्यावी म्हणून तत्कालीन महापौर आणि इतर पदाधिकाऱ्यांनी पुन्हा एकदा ही जागा जी अगोदरच बेघर पत्रकारांच्या ताब्यात आहे त्यांना देण्याचा प्रस्ताव 99 वर्षासाठी मंजुर केला. नगर विकास विभागाकडे याबाबत चौकशी करण्यात आली तेंव्हा ही जागा शाळा आणि खेळाचे मैदान या यादीत होती असे होते. तरीपण ठराव क्रमांक 209 दि.26 फेबु्रवारी 2002 रोजी मनपाच्या सर्वसाधारण सभेने या जागेवरील आरक्षण क्रमांक 31 बदलण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठवला होता. विमानतळ विस्तारीकरणामध्ये या जागेची गरज आहे काय अशी विचारणा सार्वजनिक बांधकाम विभागाला त्यावेळी करण्यात आली होती. पण सार्वजनिक बांधकाम विभागाने त्याचे काय उत्तर दिले. ते पत्र बेघर पत्रकारांच्या संचिकेत उपलब्ध नाही.
या जागेसाठी भाडे निश्चिती करण्याची जबाबदारी नोंदणी व मुद्रांक विभागाला देण्यात आली होती. त्यावरुन नोंदणी व मुद्रांक विभागाने असदुल्लाबाद येथील सर्व्हे नंबर 1 आणि 2 बाबत बेघर पत्रकारांना दिल्या जाणाऱ्या दोन एकर जागेबाबत दिलेली माहिती उपायुक्त नगर रचना यांच्या स्वाक्षरीने या संचिकेत प्राप्त झाली. त्यामध्ये या मोकळ्या दोन एकर जागेचे एकूण क्षेत्रफळ 8098 चौरस मिटर होते. त्यानुसार या जागेेचे एक वर्षाचे भाडे 83 लाख 94 हजार 880 रुपये होते. दरदिवशी हे भाडे 3498 रुपये होते. अर्थात एका महिन्याचे या जागेचे भाडे 1 लाख 4 हजार 936 रुपये होते. हा विषय सन 2006 चा आहे तर आज सन 2022 सुरू झाले आहे. तेंव्हा ठरलेल्या भाड्यानुसार आज 2022 पर्यंतचे हे भाडे किती झाले असेल याचे गणित लावण्याइतपत आमचीही पात्रता नाही. पण महानगरपालिकेने हे भाडे तरी वसुल केले काय या प्रश्नाचे उत्तर या संचिकेत मात्र सापडत नाही. म्हणूनच बेघर पत्रकारांना महानगरपालिकेने नांदेडच्या सर्वसामान्य नागरीकाची जागा दिली आणि त्यातून महानगरपालिकेचा अर्थात नांदेडच्या सर्वसामान्य नागरीकाचा काय फायदा झाला याचे एकही उत्तर या संचिकेत सापडले नाही.
बेघर पत्रकारांना दिलेली जागा दररोज 3498 रुपये भाडे तत्वावर ; मनपाने भाडे वसुल केल्याचा अभिलेख उपलब्ध नाही