नांदेड(प्रतिनिधी)-शंकर नागरी सहकारी बॅंकेने1 डिसेंबर 2020 रोजी ईलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर(एनईएफटी) साठी आयडीबीआय बॅंकेत खाते उघडले. 28 ते 31 डिसेंबर 2020 या कालखंडात झालेल्या चुकीच्या आरटीजीएस पध्दतीच्या असंख्य नोंदीमुळे 14 कोटी 46 लाख 5 हजार 347 रुपयांचा घोटाळा झाला. त्यात एकूण 3 हजार नोंदी आहेत. त्या नोंदीमधील 289 नोंदी शंका घेण्यासारख्या आहेत. याप्रकरणात अटक करण्यात आलेल्या एकूण 15 आरोपींपैकी 6 विदेशी आहेत. त्यामध्ये महिलांपण आहेत. उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने या प्रकरणातील एका विदेशी नागरीकाला आणि भारतातील एका महिलेला जामीन मंजुर केला आहे. या प्रकरणाची पुरावा सुनावणी नांदेडमध्ये सुरू झाली आहे. पुढे यातील अनेक सत्य बाहेर येणार आहेत.
आपल्या बॅंकेत घोटाळा झाला म्हणून जानेवारी 2021 मध्ये वजिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 12/2021 दाखल झाला. या प्रकरणात 15 जणांना अटक झाली. त्यातील 6 विदेशी नागरीक आहेत. सुरूवातीच्या काळात जिल्हा न्यायालय आणि उच्च न्यायालयाने यातील कोणालाच जामीन दिला नव्हता. पुढे याबाबत नियमित फौजदारी खटला क्रमांक (आरसीसी) 390/2021 नांदेड न्यायालयात सुरू झाला आणि त्यात साक्षी पुरावे सुरू झाले आहेत.
त्यानंतर उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात जामीन अर्ज क्रमांक 635, 653, 800, 801, 802, 809/2021 दाखल झाले. यामध्ये अर्जदार मोहम्मद शरीफ पिर मोहम्मद, विमलादेवी सुरेंद्रसिंह चौधरी, गलाबुजी मुकीसा रॉबट गलाबुजी फ्रेड, आयव्ही बोनुके केनेडी नायबुतो, प्रिया प्रविण माळवदे, रुमानिका रोनॉल्ड किसींबुवा ऍन्ड्रयु आणि दिक्षा मिलिंद पाटील असे आहेत. या सर्व सहा जामीन अर्जांचा निकाल एकाच निर्णयात न्यायमुर्ती एम.जी.शेवलीकर यांनी जाहीर केला. याप्रकरणातील चार जामीन अर्ज नामंजुर करण्यात आले आहेत आणि दोन मंजुर करण्यात आले आहेत. त्यामध्ये रुमानिका रोनॉल्ड किसींबुवा ऍन्ड्रयु आणि विमलादेवी सुरेंद्रसिंह चौधरी या दोघांना जामीन मंजुर केला आहे. विमलादेवीच्या खात्यावर विकास चौधरी नावाच्या व्यक्तीने पैसे जमा केले आहेत.आणि रुमानिका रोनॉल्ड किसींबुवा ऍन्ड्रयु याच्या खात्यावर थेट पैसे जमा झालेले नाहीत.
शंकर नागरी सहकारी बॅंकेच्या अधिकाऱ्यांनी 14 कोटी 46 लाख 5 हजार 347 रुपयांच्या घोटाळ्यात निष्काळजीपणा केलेला आहे. असे न्यायालयाने आपल्या निकाला लिहिलेले आहे. सुरक्षेच्या दृष्टीकोणातून चौकशी अधिकाऱ्याने योग्य काम केले नाही असेही न्यायालयाने आपल्या निकाला लिहिले आहे. शंकर नागरी सहकारी बॅंकेच्यावतीने या सर्व प्रकरणात हलगर्जीपणा झालेला आहे असेही न्यायालयाने आपल्या निकालात लिहिले आहे.
म्हणूनच या प्रकरणातील दोन जणांना उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठातील न्यायमुर्ती एम.जी.शेवलीकर यांनी जामीन मंजुर केला आहे. नांदेड न्यायालयात या प्रकरणातील नियमित फौजदारी खटला क्रमांक 390/2021 मध्ये पुरावे देणे सुरू झाले आहे. नांदेडमध्ये या प्रकरणातील आरोपींच्यावतीने ऍड.शिवाजी वडजे काम पाहत आहेत तर उच्च न्यायालयात आरोपींच्यावतीने ऍड.ए.डी.आडे हे काम पाहत आहेत.
शंकर नागरी बॅंकेतील 14 कोटीपेक्षा जास्तचा घोटाळा बॅंक अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे ; उच्च न्यायालयाचे विश्लेषण