आशिष सपुरेच्या वैद्यकीय अहवालावर आक्षेप; न्यायालयाने मागवला तुरूंग अधिकार्‍यांचा अहवाल

नांदेड(प्रतिनिधी)-दरोड्याच्या गुन्ह्यातील एका आरोपीने नांदेड ग्रामीणचे पोलीस निरिक्षक श्री अशोकरावजी घोरबांड साहेब यांनी मारहाण केल्याची तक्रार केल्यानंतर आज त्याचा वैद्यकीय अहवाल आला. तेंव्हा त्यावर आक्षेप घेत ऍड.मनप्रितसिंघ ग्रंथी यांनी तुरूंगातून अहवाल मागवावा असा अर्ज दिला आहे. न्यायालयाने तुरूंगाला तसा अहवाल पाठविण्याचे निर्देश दिले आहेत अशी माहिती ऍड.मनप्रितसिंघ ग्रंथी यांनी दिली.
                 काल दि.१९ जानेवारी रोजी सात आरोपींना पोलीस कोठड मागण्यासाठी नांदेड ग्रामीणचे पोलीस निरिक्षक श्री.अशोकरावजी घोरबांड साहेब आले असतांना त्यातील एक बलप्रितसिंघ उर्फ आशिष नानकसिंघ सपुरे यांनी मारहाणीची तक्रार केली. मारहाण करणार्‍यांमध्ये पोलीस निरिक्षक श्री अशोकरावजी घोरबांड साहेब, सहाय्यक पोलीस निरिक्षक श्री.संकेतजी दिघे साहेब आणि इतर दोन पोलीस ज्यांची नावे मला माहित नाही. अशा चार जणांनी मला उलटे लटकावून लाकडाने आणि सुंदरीने (एक प्रकारचा बेल्ट) मारहाण केल्याची सविस्तर माहिती सांगितली. न्यायालयाने आशिष सपुरेचा जबाब नोंदवून घेतला आणि त्याच्या वैद्यकीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालय विष्णुपूरी येथे पाठवले.
                      नांदेडचे शासकीय रुग्णालय विष्णुपूरी येथे अर्थात नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतच आहे. तेथे नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यातील कांही अंमलदार २४ तास ड्युटीवर असतात. अशा प्रकारे आशिष सपुरेची वैद्यकीय चाचणी पुर्ण झाली. आणि अत्यंत धक्कादायक वैद्यकीय अहवाल समोर आला. वैद्यकीय अधिकार्‍यांनी आशिष सपुरेच्या शरिरावर असलेल्या माराचे व्रण हे तीन-चार दिवस पुर्वीचे असल्याचा अहवाल दिला. यावर आज दि.२० जानेवारी रोजी ऍड.मनप्रितसिंघ ग्रंथी यांनी आक्षेप घेतला आणि न्यायालयासमक्ष सादरीकरण केले की, आशिष सपुरेला १८ जानेवारी रोजी तुरूंगातून काढून वैद्यकीय चाचणीला नेले होते. त्यावेळेसचा अहवाल तपासावा त्यात जखमा लिहिलेल्या नाहीत. सोबतच कोणत्याही आरोपीचा अटक फॉर्म भरत असतांना त्याला जुन्या जखमा आहेत काय? या कालममध्ये सुध्दा कांहीच लिहिलेले नाही. तसेच तुरूंगात जर कोणी मारहाण केली असती तर त्याची नोंद तुरूंगात असेल. त्यामुळे आता तुरूंग अधिकार्‍यांकडून १९ जानेवारी २०२२ पर्यंतचा आशिष सपुरेचा वैद्यकीय अहवाल मागवावा किंवा त्याला मारहाण झाली असेल तर त्याचा अभिलेख बोलवावा असे सादरीकरण केले.
ऍड.मनप्रितसिंघ ग्रंथी यांनी सांगितले की, तुरूंग अधिकार्‍यांचा अहवाल आल्यानंतर या प्रकरणातील पुढील कार्यवाहीबाबत मी न्यायालयासमक्ष मागणी करणार आहे. एकूणच आरोपीने पोलीस अधिकार्‍यांवर केलेला आरोप त्यानंतर वैद्यकीय अधिकार्‍यांनी पाठवलेला वैद्यकीय चाचणी अहवाल आणि त्यावर ऍड.मनप्रितसिंघ ग्रंथी यांनी घेतलेला आक्षेप या सर्व प्रकरणाला कोठे वळवून नेणार याची स्पष्टता कांही दिवसात होईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *