नांदेड,(प्रतिनिधी)-बिलोली तालुक्यातील तोरणा या गावी करणीच्या संशयामुळे एका आशा वर्करला पाच-सहा जणांनी, एका जाणत्याच्या (वैद्याच्या) सांगण्यावरुन मारहाण केली. या प्रकरणी सदर जाणत्या विरुद्ध जादूटोणा विरोधी कायद्यानुसार गुन्हा नोंदवावा, अशी मागणी अंधश्रद्धा निर्मुलन समितीने केली आहे.
बिलोली तालुक्यातील तोरणा येथील एका कुटुंबातील मुले नेहमी आजारी पडतात. उपचारासाठी ते कुटुंब कोण्या तरी वैद्याकडे (जाणत्या) कडे गेले. तेंव्हा कोणी तरी करणी केल्यामुळे तुमची मुले आजारी पडतात, असे त्या वैद्याने सांगितले. याबाबत त्याने तोरणा प्राथमिक आरोग्य उपकेंद्रातील आशा वर्कर लता शंकर नरवाडे यांचे नाव घेतले. तेंव्हा करणी करण्याच्या संशयामुळे पाच-सहा जणांनी आशा वर्कर लता नरवाडे यांना पाच-सहा जणांनी काही दिवसांपूर्वी मारहाण केली. याबाबत रामतिर्थ पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. परंतु त्याचा एफआयआर अजुन नोंदविलेला नाही. कोणावरही कसलीही कारवाई नाही. उलट त्या मारहाण करणार्यांकडून लता नरवाडे यांना जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत. त्यामुळे त्यांनी अंनिसकडे धाव घेतली. अंनिसचे राज्य कार्यकारिणी सदस्य सम्राट हटकर, जिल्हा प्रधान सचिव कमलाकर जमदाडे, प्रधान सचिव नितीन एंगडे आणि महिला विभागाच्या कॉ.उज्ज्वला पडलवाड यांनी वरील घटनेच्या संदर्भात बिलोलीचे उपविभागीय पोलीस अधीकारी व रामतिर्थ ठाण्यामध्ये वरील घटनेची माहिती दिली. आशा वर्कर या नात्याने काम करणार्यांना खेडेगावात गरोदर महिला, आजारी व्यक्ती, लहान मुलांचे डोस, लसीकरण, किशोरवयीन मुलींचे प्रबोधन तसेच सरकारी पाहणी अशा अनेक निमित्ताने घरोघरी भेटी द्याव्या लागतात. अशा परिस्थितीत करणी प्रकरणामुळे आशा वर्करकडे पाहण्याचा लोकांचा दृष्टीकोण बदलतो. लोकांचे सहकार्य मिळत नाही. त्यामुळे शासनाच्या विविध उपक्रमांवर विपरीत परिणाम होवू शकतो, असे अंनिसच्या शिष्टमंडळाने सांगितले. त्यामुळे पोलीस प्रशासनाने तोरणा येथील घटनेची गंभीरपणे दखल घ्यावी. आशा वर्करचे नाव सांगणार्या जाणत्यावर जादुटोणा विरोधी कायद्यान्वये गुन्हा दाखल करावा, अशी मागणी नांदेड अंनिसने केली आहे. त्यांच्या मागणीला पोलीसांनी सकारात्मक प्रतिसाद देवू, असे सांगितले.
करणीच्या संशयावरुन आशा वर्करला मारहाण जाणत्या विरुद्ध गुन्हा नोंदविण्याची अंनिसची मागणी