नांदेड(प्रतिनिधी)-बसस्थानकाजवळ एका लॉजच्या गच्चीवर सुरू असलेल्या 52 पत्यांच्या जुगारावर स्थानिक गुन्हा शाखेने छापा टाकून तेथे जुगार खेळणारे चार व लॉज मालक यांच्याविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.
स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक द्वारकादास चिखलीकर यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरिक्षक दत्तात्रय काळे, पोलीस अंमलदार गंगाधर कदम, पद्मसिंह कांबळे, पवार, बजरंग बोडके, गणेश धुमाळ आदींचे पथक बसस्थानकाकडे जाणाऱ्या छोट्या गल्लीतील जोशी लॉज येथे पोहचले. त्या ठिकाणी गच्चीवर जुगार खेळणारे हरदिपसिंघ बबनसिंघ सपुरे (30), अभिजित चंद्रकांत चोरमारे (30), विकास सोपान लोकडे (24), परशु गोपाल यादव (27) हे चार जण झन्ना मन्ना नावाचा 3 पत्यांचा जुगार खेळत होते. जोशी लॉजचे मालक गणेशलाल जोशी (45) यांना सुध्दा या प्रकरणात आरोपी करण्यात आले आहे. पोलीस उपनिरिक्षक दत्तात्रय काळे यांच्या तक्रारीवरुन वजिराबाद पोलीसांनी गुन्हा क्रमांक 22/2022 महाराष्ट्र जुगार कायदा कलम 12(अ) नुसार पाच जणांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. पोलीस हवालदार राठोड अधिक तपास करीत आहेत.
स्थानिक गुन्हा शाखेने लॉजमध्ये चालणाऱ्या जुगार अड्ड्यावर छापा टाकला