नांदेड(प्रतिनिधी)-विद्युत मिटर देण्यासाठी दहा हजारांची लाच घेणाऱ्या शासकीय विद्युत कंत्राटदाराला अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस.ई.बांगर यांनी दोन दिवस पोलीस कोठडीत पाठविले आहे.
काल दि.25 जानेवारी रोजी नुरी चौकात राहणाऱ्या शासकीय विद्युत कंत्राटदाराने उमरी येथे एक व्यावसायीक विद्युत मिटर देण्यासाठी एका व्यक्तीकडून 10 हजार रुपये लाच स्विकारली. त्याला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने जेरबंद केले होते. त्या लाच घेणाऱ्या विद्युत कंत्राटदाराचे नाव बालाजी गोविंद वाघमारे (49) असे आहे. विमानतळ पोलीस ठाण्यात बालाजी वाघमारे विरुध्द भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमानुसार गुन्हा दाखल झाला होता.
आज या गुन्ह्याच्या तपासीक अंमलदार पोलीस निरिक्षक मिना बकाल, पोलीस अंमलदार गणेश तालकोकुलवार , राजेश मुंडे, सचिन गायकवाड, ईश्र्वर जाधव यांनी पकडलेल्या शासकीय विद्युत कंत्राटदार वाघमारेला न्यायालयासमक्ष हजर केले. एमएससीबीच्या अधिकाऱ्यांची नावे घेवून दहा हजारांची लाच स्विकारणाऱ्या वाघमारेला सत्र न्यायाधीश एस.ई.बांगर यांनी दोन दिवस पोलीस कोठडीत पाठविले आहे.