नांदेड,(प्रतिनिधी)- इतवारा पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाने दोन चोरट्यांना पकडून त्यांच्याकडून ३२ हजार ७०० रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.आज पर्यंत त्या दोन चोरांची पोलीस कोठडी होती.
दिनांक ५ जानेवारी २०२२ रोजी आमेरखान आयुबखान यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांच्या दुकानातून चोरटयांनी रोख रक्कम,प्रिंटर,मोबाईल असा एकूण ५१ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे.तसेच दुकानाचे नुकसान केले आहे.या गुन्ह्याचा तपास पोलीस अंमलदार विक्रम वाकडे हे करीत आहेत. या बाबत इतवारा पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाचे प्रमुख पोलीस उप निरीक्षक गणेश गोटके आणि त्यांचे सहकारी पोलीस अंमलदार विक्रम वाकडे,कस्तुरे, दासरवाड,हबीब चाऊस,हंबर्डे,ज्ञानेश्वर कलंदर आदींनी या चोरीच्या बाबत माहिती काढून महमंद मुजीबखान उर्फ बटन महमंद रिझवानखान (१९) रा.महमंदिया कॉलोनी आणि महमंद सलमानखान महमंद अयुब (२१) रा.मिल्लतनगर नांदेड या दोघांना पकडले.
दोन्ही चोरट्यांना न्यायालयाने आज दिनांक २७ जानेवारी २०२२ पर्यंत पोलीस कोठडीत पाठवले होते.दरम्यान पोलीस पथकाने त्यांच्या कडून ३२ हजार ७०० रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.चोरीचा शोध लावून गुन्हेगारांना गजाआड करणाऱ्या पोलीस पथकाचे पोलीस अधीक्षक प्रमोदकुमार शेवाळे,अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे,उप अधीक्षक डॉ.सिद्धेश्वर भोरे,पोलीस निरीक्षक साहेबराव नरवाडे यांनी कौतुक केले आहे.