पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी महिला पोलीस अंमलदारांचे कर्तव्य 4 तासाने कमी केले

नांदेड(प्रतिनिधी)-महिला पोलीस अंमलदारांनी आपल्या कुटूंबाला जास्त वेळ दिल्याने कुटूंबातील ताण तणाव कमी होईल यासाठी राज्यातील महिला पोलीस अंमलदारांना दिवसात आठ तासाचे कर्तव्य प्रभारी अधिकाऱ्यांकडून दिले जावेत असे परिपत्रक पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी जारी केले आहे. सध्या हा 8 तासाच्या कामाचा आदेश प्रायोगीक तत्वावर आहे. पुढील आदेशापर्यंत तो कायम राहिल.
                            पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी राज्यातील सर्व पोलीस आयुक्त लोहमार्गासह आणि बृहनमुंबई पोलीस आयुक्त तसेच सर्व पोलीस अधिक्षक लोहमार्ग यांच्यासह निर्गमित केलेले हे आदेश सर्व परिक्षेत्रीय पोलीस विशेष महानिरिक्षकांना सुध्दा पाठवले आहेत. आपल्या पोलीस अंमलदारांनी आपले कर्तव्य बजावतांना आपल्या कुटूंबाकडे जास्तीत जास्त लक्ष द्यावे जेणे करून त्यांच्या कामात कोणत्याही प्रकारचा ताण-तणाव येणार नाही. या संदर्भाने 27 जानेवारी रोजी पोलीस महासंचालकांनी जारी केलेल्या परिपत्रकानुसार 12 तासाचे कर्तव्य पार पाडतांना पोलीस अंमलदारांना शासकीय काम आणि घर अशा दोन जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात. त्याचा परिणाम त्यांच्या शारीरिक आणि मानसिक प्रकृतीवर होतो. पोलीसी कर्तव्य व कौटूंबिक जबाबदारी याचा ताळमेळ जमवण्यासाठी वेळ हा एक अत्यंत महत्वपूर्ण घटक आहे. त्यातून महिला पोलीस अंमलदारांच्या कामाचे तास कमी करणे हा एक उपाय होवू शकतो. त्यातून महिला पोलीस अंमलदार आपले शासकीय कर्तव्य चोख बजावून आपल्या कुटूंबाला जास्त वेळ देवून आपले गृहीणी कर्तव्य उत्तम प्रकारे पार पाडू शकतील. यासाठीच महिला पोलीस अंमलदारांना आता फक्त 8 तास कर्तव्य देण्यात येत आहे.
                             राज्यातील महिला पोलीस अंमलदारांना त्यांचे दिवसाचे शासकीय कर्तव्य 8 केले तर त्यांच्या कामातील चार तास कमी होतील. यामुळे महिला अंमलदारांचे रजा मागण्याचे प्रमाण, रुग्ण निवेदन करण्याचे तसेच गैरहजर राहण्याचे प्रमाण कमी होईल आणि त्यांनी कुटूंबाला जास्त वेळ दिल्याने कुटूंबातील ताण-तणाव कमी होईल.
                          याबाबत राज्यातील महिला पोलीस अंमलदार यांच्याकडून प्राप्त झालेल्या विनंत्यांचा सर्वांगिण विचार करून सर्व पोलीस आयुक्त व सर्व पोलीस अधिक्षक यांना पोलीस महासंचालकांनी आदेश दिले आहेत की, त्यांच्याकडे उपलब्ध मनुष्यबळाचे योग्य नियोजन करून त्यांच्या अधिपत्याखाली असलेल्या सर्व महिला पोलीस अंंमलदारांना दिवसभरात 8 तासाचे कर्तव्य द्यावे. सर्व पोलीस घटकप्रमुखांनी या कामाकडे जातीने लक्ष देवून पोलीस ठाणे आणि विविध शाखा येथे काम करणाऱ्या महिला पोलीस अंमलदारांना 8 तासाचे कर्तव्य दिले जाईल यावर बारकाईने नजर ठेवायची आहे. कायद्या आणि सुव्यवस्थेची परिस्थिती असेल तर घटकप्रमुख महिला पोलीस अंमलदारांचे कर्तव्य वाढवून घेवू शकतील. राज्यातील महिला पोलीस अंमलदारांना दैनंदिन कर्तव्य 8 देण्याचा हा आदेश प्रायोगिक तत्वावर आहे. तो पुढील आदेशापर्यंत कायम राहिल. सदर आदेशाची काटेकोरपणे अंमलबजावणी व्हावी त्यासाठी प्रत्येक घटकप्रमुखाने स्वत: मेहनत घ्यायची आहे.
                              पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी राज्यभरातील महिला पोलीस अंमलदारांना गृहीणी म्हणून आपली जबाबदारी पुर्ण करता यावी. या उद्देशाने हा आदेश पारीत करून पोलीस अंमलदारांच्या प्रत्येक घटनाक्रमाकडे त्यांची बारकाईने नजर असते हे दाखवून दिले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *