नांदेड(प्रतिनिधी)-बिजूर शाळेत बेकायदेशीररित्या शिक्षकांच्या नेमणूका करून शासनाला चार कोटी 66 लाख 63 हजार 93 रुपयांचा चुना लावलेल्या प्रकरणात नांदेडच्या आर्थिक गुन्हा शाखेने बिजूर प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापकला अटक केली आहे. न्यायालयाने मुख्याध्यापकाला चार दिवस पोलीस कोठडीत पाठविले आहे. याप्रकरणातील अटक झालेला माजी शिक्षणाधिकारी एकनाथ मडावी यास अद्याप जामीन मिळालेला नाही.
18 जुलै 2019 रोजी रामतिर्थ पोलीस ठाण्यात शिक्षण विभाग जिल्हा परिषद येथील प्रशांत दिग्रसकर यांनी दिलेल्या तक्रारीवरुन गुन्हा क्रमांक 109/2019 दाखल झाला. या गुन्ह्यात भारतीय दंडसंहितेची 409, 420, 465, 466, 467, 468,471, 474, 474(अ), 109, 120(ब), 166, 201 आणि 34 अशी कलमे जोडण्यात आलेली आहेत. या प्रकरणात एकूण 9 आरोपी आहेत. त्यापैकी पोलीसांनी माजी शिक्षणाधिकारी एकनाथ मडावी यांच्यासह चार जणांना अटक केली होती. एकूण अटक आरोपींची संख्या 4 आहे. अद्याप या प्रकरणातील आरोपी दत्ता राजेगोरे आणि बजरंग पांडगे यांना पकडणे बाकी आहे. सध्या या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हा शाखेतील पोलीस निरिक्षक माणिक बेद्रे यांच्याकडे आहे.
या प्रकरणात पोलीसांनी 24 जानेवारी रोजी या संस्थेचे अध्यक्ष विश्र्वास लक्ष्मण राचूरे यास अटक केली. त्यांची पोलीस कोठडी आज दि.29 जानेवारी रोजी संपली. सोबतच पोलीसांनी बिजूर प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक सुनिल सुर्यकांत गुबनर यास अटक केलेली आहे. पकडलेल्या दोघांना न्यायायलाने चार दिवस पोलीस कोठडीत पाठविले आहे. या घोटाळ्यात शासनाच्या नियमांचे उल्लंघन करून अनेक संस्थांमध्ये मिळून असंख्य शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आणि शासनाच्या 4 कोटी 66 लाख 63 हजार 093 रुपयांच्या निधीचा अपहार करण्यात आला. आर्थिक गुन्हा शाखेने याप्रकरणी नियमित फौजदारी खटला क्रमांक 52, 57/2021 असे दोन दोषारोपपत्र दाखल केलेले आहेत. आता सध्या दोन जण आर्थिक गुन्हे शाखेच्या ताब्यात आहेत आणि आणखी दोन जणांना पकडणे बाकी आहे.