नांदेड(प्रतिनिधी)-लोकशाहीमध्ये उत्कृष्ट मार्गांचा वापर करून पत्रकारांनी समाजाला दिशा देण्याचे काम करण्याची जबाबदारी त्यांच्यावर असल्यामुळे त्यांना लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ म्हटले जाते. पण बेघर पत्रकार मंडळींनी आपल्या स्वत:च्या फायद्यासाठी केलेला बोगस पणा आता जाहिर प्रगटनाच्या माध्यमातून समोर आला आहे. त्यामुळे ज्यांच्याकडे दिशा पाहण्यासाठी एक आधार आहे असे मानले जाते. त्यांचीच दशा आता रसातळाकडे जात आहे असाच प्रकार बेघर पत्रकारांच्या भुखंड घोटाळ्यातून समोर आला आहे.
पत्रकार सहवास सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादीत नांदेड मधील भुखंड क्रमांक 30 बाबत 28 जानेवारी 2022 रोजी वर्तमानपत्रामध्ये एक जाहिर प्रगटन आले. जाहिर प्रगटन देणाऱ्या महिला आहे. हे त्यातील सर्वात मोठे दुर्देव आहे. महिलांसाठी आपल्या लेखणीला झिजवणाऱ्या पत्रकारांनी महिलेला त्रास देत असल्याचा हा प्रकार या जाहिर प्रगटनातून समोर आला आहे. पत्रकार सहवास सोसायटीने तयार केलेल्या या भुखंड घोटाळ्यातील संचिकेमध्ये 14 पत्रकार असल्याची यादी पाहायला मिळाली. याचा अर्थ या बेघर पत्रकारांच्या सोसायटीमध्ये 14 भुखंड असावेत असे त्यातून जाणवते. त्या 14 मध्ये किती पत्रकार आहेत, कोण-कोणत्या वर्तमानपत्राचे आहेत. याचे तर कांही एक उल्लेख या संचिकेमध्ये सापडले नाही. पण त्यातील कांही नावे वाचल्यावर असे दिसते की, यांनी शासनाच्या सदनिका (फ्लॅट) 10 टक्के किंमतीत सुध्दा लाटलेले आहेत. आणि इकडे बेघर पत्रकार म्हणून मिरवत आहेत. आपल्या लेखणीला झिजवून त्या लेखणीतील धार इतरांचे पितळ उघडे करण्यासाठी तळपत ठेवणाऱ्या या बेघर पत्रकारांमध्ये अनेकजण अद्रक, लसण जास्त टाकून रस्यावर ताव मारतात तेंव्हा त्यांना आपण समाजाच्या हितासाठी काम करतो आहोत याचे भान राहत नाही. रात्रीच्या रंगमंचावर वेगळ्या प्रकारची भुमिका आणि सुर्योदय झाल्यावर मी नाही त्यातली असे वागण्यात तरबेज असलेल्या या बेघर पत्रकारांनी महिलेला सुध्दा सोडले नाही हे या जाहिर प्रगटनातून समोर आले. महिला विषयक कायदे आहेत. प्रत्येक व्यक्ती महिलेला कशी मदत करता येईल यासाठी प्रयत्न करत असतो. पण बेघर पत्रकारांच्या भुखंड घोटाळ्यामध्ये एका महिलेला भुखंडाची आस दाखवून तिला ठेंगा दाखवल्याचा प्रकार या बेघर पत्रकारांनी केला आहे.
दि.28 जानेवारी 2022 रोजी सौ.सविता कालीदास शेंदारकर यांनी वर्तमानपत्रामध्येच एक जाहिर प्रगटन दिले. त्यानुसार पत्रकार सहवास सहकारी गृहनिर्माण संस्था मर्या.नांदेड, शोभानगर पाण्याच्या टाकीजवळ, मौजे असदुल्लाबाद येथील भुमापन क्रमांक 9696 चा भुखंड ज्याचे क्षेत्रफळ 8100 चौरस मिटरमधील एक भुखंड क्रमांक 30 ज्याच्या पुर्वेस भुखंड क्रमांक 29, पश्चिमेस स्वातंत्र्य सैनिक कॉलनी, दक्षिणेस रस्ता आणि उत्तरेस भुखंड क्रमांक 36 आहे. या भुखंडाची लांबी 42.8 फुट आणि रुंदी 39.8 फुट व 64.4 फुट पैकी पश्चिम बाजूचा 1200 चौरस फुट ज्याची पुर्वेकडून रुंदी 42.8 फुट आणि लांबी 25.65 फुट व 30.40 फुट आहे. ज्याची चतु सिमा पुर्वेस सदरील प्लॉटचा उर्वरीत भाग, पश्चिमेस स्वातंत्र्य सैनिक कॉलनीची हद्द, दक्षिणेस रस्ता आणि उत्तरेस भुखंड क्रमांक 36 असे या जाहिर प्रगटनात लिहिले आहे. अनेक बाबी बेघर पत्रकारांनी लपवून ठेवल्या.पण या जाहिर प्रगटनामुळे बेघरांसाठी दिलेल्या नांदेडमधील नागरीकांच्या मालकीच्या दोन एकर जागेत 36 भुखंड असल्याचे या जाहिर प्रगटनातून दिसते. महानगरपालिकेने दिलेल्या संचिकेमध्ये मात्र 14 जणांची यादी आहे आणि 15 वा क्रमांक रिकामा ठेवलेला आहे. म्हणजेच दुप्पटीपेक्षा जास्त भुखंड या दोन एकर जागेत तयार झालेले आहेत आणि तेथे आता कॉंग्रेसच्या आमदारांचे टोलजंग वाडे उभे राहत आहेत.

जाहिर प्रगटनातील महिला सौ.सविता कालीदास शेंदारकर यांनी जाहीर प्रगटनात लिहिल्याप्रमाणे बेघरांच्या पत्रकार सहवास सोसायटीमधील भुखंड क्रमांक 30 आणि त्यातील दोन वेेगवेगळ्या चतुसिमा असलेला भुखंड राजीव रामदेव जोशी रा.भुखंड क्रमांक 36 पत्रकार सहवास सोसायटी नांदेड यांच्याकडून विकत घेण्याचा करार यापुर्वीच केलेला आहे. महानगरपालिकेने दिलेल्या संचिकेमध्ये राजीव रामदेव जोशी यांचा रा.पत्ता स्वातंत्र्य सैनिक कॉलनी असा लिहिलेला आहे. म्हणजे येथे पुन्हा नवीन घोळ आहेच. राजीव जोशी यांना पैसे दिल्यावर सुध्दा ते सौ.सविता शेंदारकर यांना भुखंड नावावर करून देण्यास टाळाटाळ करीत आहेत. एवढेच नव्हे तर हा सविता शेंदारकरांना विक्री केेलेला भुखंड राजीव रामदेव जोशी हे इतर कोणाला तरी विक्री किंवा हस्तांतरण करण्याचा प्रयत्न करत असल्याचे कळाल्यानंतर सौ.सविता शेंदारकर यांनी जाहिर प्रगटन दिले आहे. या प्रगटनानुसार जनतेला सुचित करण्यात आले आहे की, या बेघर पत्रकारांच्या सोसायटीमधील भुखंड क्रमांक 30 मध्ये सविता शेंदारकर यांचे हितसंबंध आहेत. त्यांच्याकडे या भुखंडाची सौदाचिठ्ठीपण आहे. लवकरच सविता शेंदारकर योग्य न्यायालयात त्याबद्दल दाद मागणार आहेत. म्हणून या वादातीत भुखंड क्रमांक 30 बाबत कोणीही कांहीही व्यवहार करू नये. तसे केल्यास व्यवहार करणारा स्वत: जबाबदार राहिल करीता हे जाहिर प्रगटन सार्वजनिक करण्यात आले आहे.
इतरांच्या लपलेल्या गोष्टी बाहेर आणून त्यांना आपल्या नाटकीय शब्दांचा मुलामा चढवून मी किती छान लिहिले असे छद्मी हसू आपल्या चेहऱ्यावर आणून आपल्याच पिट्टूंसमोर आपल्या शब्दांची ताकत काय आहे हे दाखविण्याच्या प्रयत्न करणाऱ्या या बेघर पत्रकारांच्या भुखंड घोटाळ्यामध्ये आता एका महिलेचा विषय आला आहे. रस्त्याने चालतांना सुध्दा एखाद्या महिलेला कांही समस्या आहे असे दिसले तर हे पत्रकार त्यांच्याजवळ जावून त्यांच्या समस्येचा फायद्या आपल्या स्वत:साठी करून घेण्यात सुध्दा माहिर आहेत. आता या महिला तर भुखंड प्रकरणात पैसे देवून अडकल्या आहेत. मग त्यांची सुटका करण्यासाठी महिलेने दिलेले जाहिर प्रगटन बेघर पत्रकारांना स्वत:चे आत्मपरिक्षण करून घेण्यासाठी खुप मोठा विषय आहे.
