नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत सराफा दुकान फोडले

नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक पेक्षा जास्त सराफा दुकान फोडून चोरट्यांनी 2 लाख 50 हजारांचा ऐवज चोरला आहे. शिवनगर भागात एका घरातून चोरट्यांनी 55 हजार रुपये चोरले आहेत. थेरबन ता.भोकर येथील शेतातील 15 हजार 500 रुपये किंमतीची विद्युत मोटार चोरट्यांनी लांबवली आहे.
नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शिकारघाटकडे जाणाऱ्या रस्त्यावर आयुब खान पिरखान पठाण यांची आणि त्यांच्या शेजारी असलेल्या एका व्यक्तीची असे दोन सराफा दुकान चोरट्यांनी फोडले आणि काऊंटरमध्ये ठेवलेले सोन्या-चांदीचे दागिणे किंमत 2 लाख 50 हजार रुपयांचे चोरले आहेत. नांदेड ग्रामीण पोलीसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून कर्तव्यदक्ष पोलीस निरिक्षक श्री. अशोकरावजी घोरबांड साहेब यांच्या सक्षम मार्गदर्शनात पोलीस उपनिरिक्षक माणिक हंबर्डे अधिक तपास करीत आहेत. सराफा दुकान फोडण्याचा प्रकार 28 जानेवारीच्या सायंकाळी 6 ते 29 जानेवारीच्या सकाळी 7.30 वाजेदरम्यान घडला.
संदीप शिवाजी मस्के रा.शिवनगर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 28 जानेवारीच्या रात्री 11.45 ते 29 जानेवारीच्या सकाळी 7.30 वाजेदरम्यान त्यांचे शिवनगर येथील घरफोडून चोरट्यांनी कपाटात ठेवलेले 55 हजार रुपये रोख चोरून नेले आहेत. विमानतळ पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस अंमलदार पांचाळ अधिक तपास करीत आहेत.
थेरबन ता.भोकर येथील शेतकरी भिमराव येलप्पा दासरे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 28 जानेवारीच्या सायंकाळी 6 ते रात्री 8 अशा दोन तासाच्यावेळेत कोणी तरी चोरट्यांनी त्यांच्या शेतातील मोटार व वायर असा 15 हजार 500 रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. भोकर पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस अंमलदार देवकांबळे अधिक तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *