नांदेड(प्रतिनिधी)-शहरातील नवा मोंढा भागात एसबीआय बॅंकेसमोर आपली चार चाकी गाडी उभी करून काही कामानिमित्त खाली उतरलेल्या एका कंत्राटदाराची बॅग चोरट्यांनी चारचाकी गाडीचे डावीकडील काच फोडून एक लाख रुपयांची बॅग लंपास केली आहे. हा प्रकार आज 31 जानेवारी रोजी दुपारी 4.30 वाजेच्या सुमारास घडला आहे.
पिंपळगाव महादेव ता.अर्धापूर येथील कंत्राटदार गोविंद रामराव देशमुख यांनी कामगारांना पगार देण्यासाठी एसबीआय बॅंक शाखा नवा मोंढा येथून 1 लाख रुपये काढले. त्यांनी ती एक लाख रूपयांची बॅग आपल्या चारचाकी वाहनात डावीकडच्या सीटवर ठेवली आणि ते कांही कामानिमित्त इकडे-तिकडे गेले. चोरट्यांनी बहुदा कंत्राटदार देशमुख यांच्या हालचालीवर नजर ठेवलेली होती आणि त्याचा फायदा उचलत चोरट्यांनी त्या चार चाकी वाहनाचे डावीकडील काच फोडले आणि देशमुख यांची 1 लाख रुपयांची बॅग घेवून लंपास झाले.
घटनेची माहिती मिळताच शिवाजीनगरचे पोलीस पथक, स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस पथक घटनास्थळी पोहचले. ज्या ठिकाणावरून एक लाखांची बॅग चोरीला गेली त्या ठिकाणी बरेच सीसीटीव्ही आहेत. त्या सीसीटीव्ही मधील फुटेज तपासून पोलीस चोरट्यांचा माग काढणार आहे.