नांदेड(प्रतिनिधी)-3 वर्ष 8 महिने वय असलेल्या निरागस बालिकेवर अत्याचार करणाऱ्या 66 वर्षीय जखड म्हाताऱ्याला नांदेडचे पॉक्सो न्यायालयाचे विशेष न्यायाधीश रविंद्र पांडे यांनी अडीच वर्ष सक्तमजुरी आणि 1 हजार रुपये रोख दंड अशी शिक्षा ठोठावली आहे. या घटनेतील अल्पवयीन निरागस बालिका ‘डिलेड माईल्ड स्टोन‘ या आजाराने ग्रस्तीत आहे.
नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका महिलेले दिलेल्या तक्रारीनुसार त्यांची 3 वर्ष 8 महिने वय असलेली बालिका त्यांच्या शेजारी असलेल्या सुरेश विठ्ठलराव लांडगे (66) यांच्या नातवांसोबत खेळण्यासाठी त्यांच्या घरी जात असे. घरात 66 वर्षीय सुरेश लांडगे नेहमी असत म्हणून बालिका सुरक्षीत आहे असे आईला वाटत असत. दि.3 सप्टेंबर 2019 रोजी दररोजप्रमाणे ही बालिका सुरेश लांडगे यांच्या घरात गेली. त्यावेळी तेथेच राहणाऱ्या एका महिलेने सुरेश लांडगेने घराचे दार बंद करतांना पाहिले. हे पाहणाऱ्या महिलेला माहित होते की, सुरेश लांडगेच्या घरात आज कोणी नाहीत. वैद्यकीय उपचारासाठी सुरेश लांडगे याच्या घरातील इतर सर्व मंडळी दवाखान्यात गेलेली होती. सुरेश लांडगेला दरवाजा बंद करतांना पाहणाऱ्या महिलेने ही बाब त्या निरागस बालिकेच्या आईला सांगितली. बालिकेची आई सुरेश लांडगेच्या घरात गेली तेंव्हा तिथे घडलेला प्रकार एवढा भयंकर होता की, त्या आईला रागाचा पारावार उरला नाही. सुरेश लांडगेने त्या 3 वर्ष 8 महिने असलेल्या बालिकेसोबत शारिरीक अन्याय केलेला उघड दिसत होता. त्वरीत त्या आईने आपल्या नवऱ्याला घडलेला प्रकार सांगितला आणि या बाबतची तक्रार नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात दिली.
नांदेड ग्रामीण पोलीसांनी या तक्रारीनुसार गुन्हा क्रमांक 432/2019 दाखल केला. या गुन्ह्यात भारतीय दंड संहितेची कलमे 376(अ)(ब) आणि पोक्सो कायदा कलम 4 आणि 6 जोडण्यात आली होती. या गुन्ह्याचा सुरुवातीचा तपास महिला पोलीस उपनिरिक्षक एस.ए.कदम यांनी केला. त्यानंतर हा तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक व्ही.जी.कासले यांच्याकडे देण्यात आला. पोलीसांनी सुरेश विठ्ठलराव लांडगे (66) विरुध्द न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. न्यायालयात या खटल्याला विशेष पोक्सो सत्र खटला क्रमांक 52/2019 मिळाला.
या सत्र खटल्यामधील अल्पवयीन निरागस बालिकेचा जन्म दि.29 डिसेंबर 2015 रोजी झालेला आहे. तिला ‘डिलेड माईल्ड स्टोन‘ हा आजार आहे म्हणजे ती सर्वसामान्य बालकांसारखी वाढली नाही. उदाहरनार्थ बालके दोन अडीच वर्षात सर्वच बाबी बोलू शकतात. पण ही बालिका 3 वर्ष 8 महिन्यांची असतांना सुध्दा तिला बोलता येत नव्हते. अशा परिस्थितीत सुध्दा तिने इशारांनी आपल्यासोबत झालेला अत्याचार आणि घटनाक्रम रडत रडत सांगितला होता. न्यायालयात एकूण 7 साक्षीदारांनी आपले जबाब नोंदवले. उपलब्ध पुरावा आधारे न्यायाधीश रविंद्र पांडे यांनी 66 वर्षाचे वय असतांना असे गैर कृत्य करणाऱ्या सुरेश विठ्ठलराव लांडगेला अडीच वर्ष सक्त मजुरी आणि एक हजार रुपये रोख दंडाची शिक्षा ठोठावली. या खटल्यात सरकार पक्षाची बाजू ऍड. एम.ए.बत्तुला (डांगे) यांनी मांडली होती. नांदेड ग्रामीणचे पोलीस अंमलदार फय्याज सिद्दीक यांनी पैरवी अधिकाऱ्यांची भुमिका वठवली होती.
खात्रीलायक सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सुरेश लांडगेने असे अल्पवयीन बालिकांवर अनेक अत्याचार केले होते. पण त्या संदर्भाची तक्रार पोलीस ठाण्यात दाखल झाली नाही. पण बालिकेच्या आईने हिंमत दाखवली आणि हा गुन्हा दाखल झाला. सुरेश लांडगेला पकडल्यानंतर त्याला जामीन मिळण्यासाठी सुध्दा कोणी अर्ज केला नव्हता म्हणून पकडले तेंव्हा पासून सुरेश लांडगे तुरूंगातच आहे.