नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चोरीचा गुन्हा स्थानिक गुन्हा शाखेने उघड केला 

नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या सन 2021 यशस्वी गाथेला सन 2022 मध्ये स्थानिक गुन्हा शाखेने त्या यशस्वी गाथेला नवीन फुल गुंफून यशस्वीतेला आकार दिला आहे. स्थानिक गुन्हा शाखेने चार चोरट्यांना पकडून त्यांनी चोरलेले जवळपास 2 लाख 16 हजारांचे साहित्य नांदेड ग्रामीण पोलीसांकडे वर्ग केले आहे. 
                              स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक द्वारकादास चिखलीकर यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस उपनिरिक्षक दत्तात्रय काळे, पोलीस अंमलदार गंगाधर कदम, बालाजी तेलंग, विकास कदम, गणेश धुमाळ आणि शिंदे हे गुन्हेगारांचा शोध घेत असतांना त्यांनी जितेश बाबाराव वानखेडे (22) रा.एमआयडीसी सिडको, कृष्णा शिवकुमार पईतवार (23) रा.सिडको, वैभव उर्फ विक्की अनिल नरवाडे (23) रा.दिक्षानगर ऋषीकेशव विजय जाधव (20) टेम्पो चालक रा.गोपाळचावडी नांदेड या चार जणांसह 17 वर्षाच्या एका विधीसंघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेतले. त्यावेळी त्यांना मिळालेल्या माहितीनुसार 29 जानेवारी 2022 च्या रात्री सिमेंट पाईप बनविणाऱ्या मेघावी कंपनी एमआयडीसीजवळ येथून चोरलेले सहा रिंग टेम्पोमध्ये टाकले आणि ते चोरून नेले. याबाबत नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने माहिती घेतली तेंव्हा तेथे गुन्हा क्रमांक 56/2022 हा चोरीच्या संदर्भाचा गुन्हा दाखल होता. 
                       या प्रकरणात पोलीसांनी भंगार दुकानवाल्याकडून प्रत्येकी 6 हजार रुपये किंमत असलेले 6 लोखंडी रिंग जप्त केले. तसेच चोरी करण्यासाठी वापरलेले दीड लाख रुपये किंमतीचा टेम्पो ऋषीकेश जाधवकडून जप्त केला. या टेम्पोचा क्रमांक एम.एच.26 ए.डी.9155 असा आहे. तसेच कृष्णा पईतवार कडून एक दुचाकी गाडी गाडी क्रमांक एम.एच.26 वाय.8750 ही 30 हजार रुपयांची गाडी जप्त केली. चोरट्यांकडून जप्त केलेल्या ऐवजाची एकूण किंमत 2 लाख 16 हजार रुपये आहे. स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस उप निरीक्षक दत्तात्रय काळे यांनी पकडलेले  चार आरोपी आणि  एक विधीसंघर्षग्रस्त बालक, जप्त केलेला चोरीचा ऐवज, चोरी करण्यासाठी वापरलेल्या गाड्या नांदेड ग्रामीण पोलीसांच्या ताब्यात देवून पुढील तपास करण्याची विनंती केली आहे. 
                  नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यातील गुन्हा उघडकीस आणणाऱ्या स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाचे पोलीस अधिक्षक प्रमोदकुमार शेवाळे, अपर पोलीस अधिक्षक निलेश मोरे, इतवाराचे पोलीस उपअधिक्षक डॉ.सिध्देश्र्वर भोरे आदींनी कौतुक केले आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *