नांदेड(प्रतिनिधी)-शहरातील वजिराबाद भागातील डॉक्टर्सलेन येथील गुरूराज हॉस्पीटलने बायॉमेडिकल वेस्ट (जैविक कचरा) मनपाच्या घंटागाडीत टाकला म्हणून मनपाने गुरूराज हॉस्पीटलकडून 10 हजार रुपये दंड वसुल केला आहे.
जैविक कचरा कोठे नेऊन त्याचा शेवट करावा यासाठी एक नियमावली आहे. त्या नियमावलीनुसार जेथे-जेथे जैविक कचरा तयार होतो त्यांनी तो कचरा ठरवून दिलेल्या ठिकाणीच टाकायला हवा. आज 9 फेबु्रवारी रोजी प्रभाग क्रमांक 17 मधील गुरूराज हॉस्पीटलने आपल्या दवाखान्यातील जैविक कचरा घंटागाडीत टाकला. या कृतीमुळे शहरातील नागरीकांच्या आरोग्यास धोका निर्माण होतो आणि म्हणूनच मनपा अधिकाऱ्यांनी गुरूराज हॉस्पीटलकडून जैविक कचऱ्याची अयोग्य विल्हेवाट लावण्यात आली म्हणून त्यांच्याकडून 10 हजार रुपये रोख दंड वसुल केला आहे.
ही कार्यवाही मनपा आयुक्त डॉ.सुनिल लहाने, अतिरिक्त आयुक्त बाबासाहेब मनोहरे, उपायुक्त शुभम क्यातमवार यांच्या मार्गदर्शनात स्वच्छता विभागाचे सहाय्यक आयुक्त गुलाम मोहम्मद सादेक, क्षेत्रीय अधिकारी डॉ.रईसोद्दीन, मुख्य स्वच्छता निरिक्षक राजेंद्र गंदमवार, स्वच्छता निरिक्षक वसिम तडवी व इतर अधिकाऱ्यांनी पुर्ण केली.
नांदेड शहरातील सर्व दवाखाने आणि जैविक कचरा तयार होणाऱ्या जागा यांना महानगरपालिकेने आवाहन केले आहे की, दैनंदिन तयार होणारा जैविक कचरा मनपाच्या घंटागाडीत किंवा सार्वजनिक ठिकाणी न टाकता तो कचरा मनपाने ठरवून दिलेल्या संस्थेकडे नेऊनच नष्ट करावा. अशी कृती करणाऱ्यांविरुध्द घनकचरा व्यवस्थापन नियम 2016 आणि बायॉमेडिकल वेस्ट हॅन्डलिंग रुल्स 1998 मधील तरतूदीनुसार कडक दंडात्मक कार्यवाही होणार आहे. तरी सर्वांनी जैविक कचऱ्याची विल्हेवाट लावतांना ठरवलेल्या नियमावलीप्रमाणे ती प्रक्रिया पुर्ण करावी.