तक्रारदाराला जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाने दिले 20 हजार
नांदेड(प्रतिनिधी)-फायनान्स कंपनीने आणि बॅंकेने आपल्या सेवेत दिलेल्या त्रुटीमुळे तक्रारदारास झालेल्या मानसिक त्रासासाठी 15 हजार रुपये आणि प्रकरणाचा खर्च म्हणून 5 हजार रुपये असे 20 हजार रुपये बजाज फायनान्स कंपीनीने द्यावेत तसेच बजाज कंपनीने मराठी भाषेची तोडमोड करून दिलेल्या लेखी कथनासाठी त्यांना 5 हजार रुपये दंड आकारण्यात आला आहे. दंडाची रक्कम विधीसेवा प्राधिकरणाच्या खात्यात जमा करायची आहे. हे आदेश जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग नांदेड यांनी निर्गमित केलेले आहेत. आयोगात अध्यक्ष अनुराधा सातपुते, सदस्य कविता देशमुख आणि रविंद्र बिलोलीकर हे आहेत.
नांदेड येथील सुरजितसिंघ शेरसिंघ फौजी यांनी जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाकडे प्रकरण क्रमांक 602/2020 दाखल केले. सुरजितसिंघ फौजी यांच्या तक्रारीप्रमाणे त्यांनी बजाज फायनान्स कंपनीकडून कर्ज घेतले हेाते. या कर्जाची परतफेड ऑनलाईन पध्दतीने त्यांच्या बॅंक खात्यातून व्हावी असा करार होता. त्यांचे बॅंक खाते आयडीबीआय बॅंकेत आहे. वेगवेगळी कारणे दाखवून बॅंक आणि बजाज कंपनी यांनी त्यांच्या खात्यातील ऑनलाईन पध्दतीत एकाच दिवशी 34 वेळा 590 रुपये काढून घेतले. त्यामुळे त्याचा एकूण गुणाकार 21 हजार 750 रुपये होता. ही रक्कम दि.3 जुलै 2020 रोजी एकाच दिवशी कपात झाली. बॅंकेने आणि फायनान्स कंपनीने आपल्या सेवेत त्रुटी करत माझे पैसे परस्पर वळती केले म्हणून निष्काळजीपणा आणि फसवणूकीची सेवा दिल्याबद्दल 1 लाख रुपये दंड, शारिरीक व मानसिक त्रासापोटी 1 लाख रुपये आणि नुकसान भरपाई म्हणून 50 हजार रुपये आणि तक्रारीचा खर्च म्हणून 10 हजार रुपये मला बजाज फायनान्स कंपनी शाखा व्यवस्थापक नांदेड, मुख्य व्यवस्थापकीय संचालक बजाज फायनान्स को-ऑफीस पुणे, आयडीबीआय बॅंक नांदेड कार्यालय आणि मुख्य कार्यालय मुंबई यांच्याकडून घेवून द्यावेत असा या तक्रारीचा आशय होता.
या तक्रारीत आपले लेखी कथन सादर करतांना बजाज फायनान्स कंपनी नांदेड आणि मुख्य कार्यालय पुणे यांनी मराठी भाषेचे वाभाडे काढत उत्तर दिले. घडलेल्या एकूण प्रकरणाची, सुरजितसिंघ फौजी यांच्या बॅंक खात्याची पाहणी केल्यानंतर न्यायालयाने बजाज कंपनीने सुरजितसिंघ फौजी यांना झालेल्या मानसिक त्रासाबद्दल 15 हजार रुपये द्यावेत तसेच प्रकरणाचा खर्च म्हणून 5 हजार रुपये द्यावेत असे आपल्या आदेशात लिहिले आहे. या प्रकरणाचा निकाल देतांना आयोगाने अत्यंत गबाळ मराठी भाषा वापरून लेखी उत्तर दिले होते. त्यावर रोष व्यक्त केला. मराठी भाषेचे वाभाडे काढणाऱ्या बजाज कंपनीला आयोगाने 5 हजार रुपये रोख दंड ठोठावला आहे आणि ही दंडाची 5 हजार रुपये रक्कम विधीसेवा प्राधिकरणच्या खात्यात जमा करण्याचे आदेश दिले आहेत. बजाज कंपनीने आदेश झाल्याच्या तारखेपासून 45 दिवसात हे पैसे द्यायचे आहेत. या प्रकरणात तक्रारदार सुरजितसिंघ शेरसिंघ फौजी यांच्यावतीने ऍड.जयदेवसिंघ जिम्मेदार, बजाज फायनान्स कंपनीच्यावतीने ऍड. गजानन खनगुंडे आणि आयडीबीआय बॅंकेच्यावतीने ऍड. संगमेश्र्वर देलमाडे यांनी काम पाहिले.
मराठी भाषेचे वाभाडे काढणाऱ्या बजाज फायनान्स कंपनीला 5 हजार दंड