नांदेड(प्रतिनिधी)-राज्य शासनाने वाळूचा अवैध उपसा थांबविण्यासाठी नवीन वाळू धोरण मागील महिन्यातच जारी केले. पण आज सकाळी नांदेडच्या गोवर्धनघाट पुलावरून जाणाऱ्या एका व्यक्तीने नदी पात्रात घेतलेल्या फोटोवरून गोदावरी नदीच्या पोटातून मशीनद्वारे रेती उत्खनन होत असल्याचे चित्र दिसते आहे. यावर प्रशासनातील कोणत्याही विभागाचे नियंत्रण मात्र नाही म्हणून अवैध रेती उत्खनन करणाऱ्यांना कोणी भितीच नाही असाच या फोटोचा अर्थ आहे.
नांदेड शहरातील गोवर्धनघाट पुलावरून बरेच जण सकाळी मॉर्निंग वॉकला जातात. त्यातील एकाने पाठवलेल्या एका फोटोमध्ये गोदावरी नदीपात्रात तराफ्यांवर कांही व्यक्ती नदीच्या मधोमध दिसतात. एका तराफ्यावर वाळू दिसते. एका तराफ्यावर मशीन लावलेली आहे. त्या मशीनद्वारे वाळू नदीतून त्या तराफ्यावर येते. अशी पध्दतीने शहरातून वाहणाऱ्या गोदावरी नदीच्या पोटाला खोदले जात आहे. पण प्रशासन याकडे कोणतेही लक्ष देत नाही. आज सकाळी मॉर्निंग वॉकमधील एका व्यक्तीने पाठवलेल्या फोटो प्रमाणे सकाळी 8.48 वाजेचे हेे चित्र आहे. म्हणजे अवैध उत्खननाचे काम गोवर्धनघाट पुलाखाली असलेल्या गोदावरी नदीपात्रात अव्याहतपणे सुरूच आहे. कोणत्याही व्यक्तीला त्याची भिती वाटते आहे असे या फोटोमध्ये दिसत नाही. ते बिनदिक्कत आपले काम करत आहे.
नांदेडचे कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी डॉ.विपीन यांनी याच गोदावरी नदीच्या गोवर्धनघाट पुलाखाली एक-दोन वेळेस भेट दिली होती. त्यावेळी वाळूच्या तराफ्यावरून वाळू नदीकाठावर आणली जाते आणि गाडीत भरून शहरात नेली जाते. याला पाहुन डॉ.विपीन यांनी तो रस्ताच बंद करण्याची सुचना केली होती. पण तो रस्ता कांही बंद झाला नाही आणि अवैध वाळू चोरी सुरूच राहिली. आजही ज्या पध्दतीने ही मंडळी काम करत आहे. त्या पध्दतीनुसार यांना कोणीच भिती नाही असेच दिसते. अवैध वाळू उत्खननावर कार्यवाही करण्याचे अधिकारी सर्वपरी जिल्हाधिकाऱ्यांच्या नियंत्रणात असतात. तरीपण यावर कार्यवाही मात्र झालेली नाही. किंवा जिल्हाधिकाऱ्यांना ती करता आली नाही काय? हा प्रश्न उपस्थित होत आहे.
गोवर्धन घाट पुलाखाली अवैध रेती उत्खनन आता मशीनद्वारे