
नांदेड(प्रतिनिधी)-घुंगराळा शिवारातून एका ट्रॅक्टर चालकाला रस्त्यावर थांबवून त्याच्या ट्रॅक्टरचे हेड बळजबरीने चोरून नेणाऱ्या कार चालकांना नांदेड जिल्ह्याच्या पोलीस नियंत्रण कक्षाने क्रमांक 112 वर माहिती प्रसारीत केल्यानंतर देगलूर पोलीसांनी हा चोरीचा ट्रॅक्टर आणि चोरटे कांही तासातच ताब्यात घेतले. आज कुंटूर पोलीसांनी या चोरट्यांना न्यायालयात हजर केल्यानंतर नायगावच्या प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी कु.आर.बी.सोरेकर यांनी या तीन चोरट्यांना दोन दिवस पोलीस कोठडीत पाठविले आहे.
दहिकळंबा ता.कंधार येथील साहेबराव शिंदे यांच्या मालकीचा ट्रॅक्टर क्रमांक एम.एच.26 बी.क्यू.1914 हा अंकुश प्रेमदास चव्हाण हा चालवत होता. 10 फेबु्रवारी मध्यरात्रीनंतरच्या 3 वाजताच्या सुमारास तो नांदेड-नायगाव रस्त्यावरून जात असतांना घुंगराळा शिवारात कार क्रमांक एम.एच.24- व्ही.9702 ने त्याला थांबवले. चालक अंकुश चव्हाणला ट्रॅक्टरच्या खाली उतरवून ट्रॅक्टरचे हेड 9 लाख रुपये किंमतीचे बळजबरीने चोरून नेले. घडलेला प्रकार अंकुश चव्हाणने कुंटूर पोलीसांना कळवला. तसेच नियंत्रण कक्षातील तातडीची मदत क्रमांक 112 वर कॉल केला. 112 वरून प्रसारीत झालेल्या माहितीचा संदेश देगलूर पोलीसांना मिळाल्यावर देगलूरचे पोलीस निरिक्षक सोहन माछरे यांच्या मार्गदर्शनात पोलीस अंमलदार अशोक यरपलवाड आणि मिर्झा अहेमद बेग यांच्या पथकाने ट्रॅक्टर हेड आणि चोरी करणारी 4 चाकी गाडी आणि त्यात असणारे 3 जण ताब्यात घेतले.
अंकुश चव्हाणच्या तक्रारीवरुन कुंटूर पोलीसांनी या प्रकरणी गुन्हा क्रमांक 24/2022 भारतीय दंड संहितेच्या कलम 392, 341 आणि 34 नुसार दाखल केला. या गुन्ह्याचा तपास कुंटूरचे सहाय्यक पोलीस निरिक्षक माधव पुरी यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरिक्षक संजय अटकोरे यांच्याकडे देण्यात आला. देगलूर पोलीसांनी पकडलेले चोर आणि ट्रॅक्टरचे हेड तसेच चोरी करणारी गाडी आणि त्यातील 3 जण कुंटूर पोलीसांच्या स्वाधीन केले. चोरी करणाऱ्या मंडळींची नावे अतुल लक्ष्मण गुंठे (34), पांडूरंग सुग्रीव शिंदे (30), हरीदास ब्रम्हदेव शिंदे (32) रा.हागरुळ जि.सोलापूर अशी आहेत.
पोलीस उपनिरिक्षक संजय अटकोरे, त्यांचे सहकारी पोलीस अंमलदार यांनी पकडलेल्या तीन जणांना नायगाव प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयात हजर केले. घडलेल्या गुन्ह्याचा तपास होण्यासाठी पोलीस कोठडीची आवश्यकता मांडण्यात आली. त्यानुसार न्यायाधीश सोेरेकर यांनी या तीन चोरट्यांना दोन दिवस अर्थात ६ फेब्रुवारी २०२२ पर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे. घटना घडताच त्वरीत हालचाल करून चोरट्यांना जेरबंद करणाऱ्या देगलूर पोलीस पथकाचे आणि कुंटूर पोलीसांचे पोलीस अधिक्षक प्रमोदकुमार शेवाळे, अपर पोलीस अधिक्षक निलेश मोरे, पोलीस उपअधिक्षक विक्रांत गायकवाड, स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक द्वारकादास चिखलीकर यांनी कौतुक केले आहे.