नांदेड(प्रतिनिधी)-पोलीस ठाणे हिमायतनगर येथे दोन पोलीस आणि पोलीसांचा दलाल असलेला पत्रकार अशा तीन जणांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने गजाआड केले आहे.
दि.13 फेब्रुवारी 2022 रोजी एका तक्रारदाराने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली की, त्यांच्या भावाविरुध्द पोलीस ठाणे हिमायतनगर येथे तक्रार देण्यात आली आहे. त्या प्रकरणात मोठी कार्यवाही न करणे आणि तक्रारदारावर प्रतिबंधात्मक कार्यवाही करून सोडून देण्यासाठी 5 हजार रुपये लाचेची मागणी करत आहेत. या तक्रारीच्या अनुषंगाने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने 14 फेब्रुवारी रोजी हिमायतनगर परिसरात लावलेल्या सापळ्याच्या वेळेस पोलीस अंमलदार वनदेव कनाके आणि शेख महेबुब यांच्यावतीने पत्रकार सय्यद मन्नान याने पाच हजार रुपये लाचेची मागणी केली तडजोड करून नंतर दोन हजार रुपये स्विकारले. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने या तिघांना गजाआड केले. 14 फेब्रुवारी रोजी हिमायतनगर येथील पोलीस अंमलदार वनदेव गोवर्धन कनाके (51) वर्ष मुळ रा.भिलगाव ता.किनवट, शेख महेबुब शेख जिलानी मुळ रा.कोपरा ता.हदगाव तसेच पत्रकार व मुद्रांक विक्रेता सय्यद मन्नान सय्यद अब्दुल (54) रा.बाजार चौक गल्ली हिमायतनगर या तिघांविरुध्द भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 नुसार गुन्हा क्रमांक 25/2022 दाखल करण्यात आला आहे.
ही सापळा कार्यवाही पोलीस अधिक्षक डॉ.राहुल खाडे, अपर पोलीस अधिक्षक धरमसिंग चव्हाण, उपाधिक्षक राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरिक्षक अरविंद हिंगोले, पोलीस अंमलदार किशन आरेवार, बालाजी तेलंग, जगन्नाथ अनंतवार, गणेश तालकोकुलवार, शेख मुजीब आणि गजानन राऊत यांनी पुर्ण केली.
लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने ही माहिती देतांना जनतेला आवाहन केले आहे की, कोणी शासकीय अधिकारी, कर्मचारी, शासकीय काम करण्यासाठी लाचेची मागणी करीत असेल तसेच त्याच्या लाच मागणीचे मोबाईल फोनवर बोलणे असेल,ऑडीओ, व्हिडीओ असेल, एसएमएस असतील तसेच भ्रष्टाचार संबंधाने कांही माहिती असेल तसेच माहिती अधिकारात शासकीय अधिकारी, कर्मचारी यांनी शासकीय निधीचा भ्रष्टाचार केल्याची माहिती प्राप्त झाली असेल तर याबाबत लाच लुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा. त्यासाठी टोल फ्रि क्रमांक 1064(2), कार्यालयाचा फोन क्रमांक 02426-253512, पोलीस उपअधिक्षक राजेंद्र पाटील यांचा मोबाईल क्रमांक 7350197197 यावर सुध्दा माहिती देता येईल तसेच एसीबी विभागाच्या शासकीय संकेतस्थळावर, मोबाईल ऍपवर आणि फेसबुक पेजवर सुध्दा याची माहिती देता येईल जनतेने भ्रष्टाचार रोखण्यासाठी ही माहिती द्यावी असे आवाहन एसीबी विभागाने केले आहे.
आता पत्रकारात दलाली आली ….
वास्तव न्युज लाईव्ह मागील अनेक दिवसांपासून बेघर पत्रकारांचा भुखंड घोटाळा हा विषय आपल्या लेखणीतून मांडत आहे.पत्रकार भवन अजून लिहायचा आहे. हिमायतनगर येथे लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या कार्यवाहीतून पत्रकार दलाली सुध्दा करतात हा एक नवीन विषय समोर आला आहे. पोलीस अंमलदार कनाके आणि शेख यांना काय करायचे हा त्यांचा प्रश्न आहे. त्यात पत्रकार सय्यदला उडी घेण्याची काही गरज नव्हती. पण ज्या प्रयत्नांचा उल्लेख लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या माहितीत देण्यात आला आहे. तो अवघड विषय आहे. पोलीसांच्यावतीने लाचेच्या पैशाची मागणी सुध्दा पत्रकार सय्यदने केलेली आहे. तसेच तडजोडीनंतर मागितलेल्या लाचेतील पैसे कमी करून रक्कम स्विकारली पण आहे. कोण्या एका व्यक्तीच्या लाचेच्या पैसे कमी करण्याचा अधिकार पत्रकार सय्यदला आहे म्हणजे त्यांची पोलीसांसोबत असलेली पोहच लक्षात येते.