तलाठी मनोज देवणे खाजगी कार्यालयाप्रमाणे तलाठी कार्यालय चालवतात

नांदेड(प्रतिनिधी)-कौठा सज्जातील तलाठी खाजगी लोकांना कामाला लावून महावितरण कंपनीप्रमाणे गुत्तेदारीवर काम चालवतात अशा आशयाचा एक अर्ज कौठा भागात राहणाऱ्या सुनिल पाटील यांनी जिल्हाधिकारी नांदेड यांच्यासह मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि तहसीलदार नांदेड यांना सुध्दा हा अर्ज पाठवला आहे.

कौठा परिसरात राहणाऱ्या सुनिल पाटील नावाच्या व्यक्तीने जिल्हाधिकारी डॉ.विपीन यांना दिलेल्या एका अर्जाप्रमाणे कौठा सज्जाचे तलाठी मनोज देवणे यांच्या कार्यालयात अनेक गैर प्रकार चालतात. खाजगी कार्यालयाप्रमाणे तलाठी कार्यालय चालवले जाते. जमीन खरेदी केल्यानंतर 7/12 फेरफार लावण्यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध नाही. त्यामुळे ऑफ लाईन अर्ज करावा लागतो. याचाच फायदा घेवून जमीन खरेदी कर्त्याकडून तलाठी कार्यालयात फक्त कागदपत्रे जमा करून घेतली जातात. त्यांना कागदपत्र जमा करून घेतल्याची पावती दिली जात नाही. त्यांचा फेरफार अर्ज महिनोगिनती पुर्ण केला जात नाही. प्रत्येक सत्य व कागदपत्र सोबत असतांना सुध्दा फेरफारासाठी खाजगी किंमत 5 ते 10 हजार रुपये मोजावी लागते. फेरफारामध्ये काही कागदपत्र कमी असतील तर खाजगी किंमत हजारो ते लाखो पर्यंत द्यावी लागते असे अनेक गैरप्रकार तलाठी सज्जा कौठा परिसरात सुरु आहेत. तलाठी कार्यालय चालविण्यासाठी गुत्तेदाराप्रमाणे खाजगी माणसे ठेवलेली आहेत. जे सर्व आर्थिक व्यवहार पाहतात. मोठ-मोठ्या लोकांनी दुरध्वनी केला तर मला साहेबांनी दुसरी ड्युटी लावली हे एकच उत्तर तलाठी मनोज देवणे देतात. प्रत्यक्ष तलाठी कार्यालयात तलाठी मनोज देवणे कधी चक्कर मारतात याचा थांगपत्ता सुध्दा कधी लागत नाही.

जिल्हाधिकारी साहेबांनी रेती माफिया रोखण्यासाठी दिवस रात्र मेहनत घेतली पण ती कार्यवाही विफल होण्यामध्ये तलाठी साहेबच कारणीभुत आहेत. कारण तलाठी साहेबांना हप्ता दिला जातो. म्हणून ज्या दिवशी बेकायदेशीर अवैध वाळूवर कार्यवाही होणार आहे याची पुर्व कल्पना तलाठी साहेब रेती माफीयांना देतात असे घडते. तलाठी मनोज देवणे यांच्या कार्यक्षेत्रात वाळूच्या गाड्या पकडून प्रत्येक गाडीकडून 20 ते 25 हजार रुपये वसुल करून जागीच सोडून देतात. सुनील पाटील यांनी लिहिल्याप्रमाणे महसुल विभागाकडेच महसुल चोर आहेत. रेती उपसा करून त्यावर हजारो कामगारांची उपजिविका भागते पण शासनाने नेमलेल्या या अधिकाऱ्यांकडे 20-20 लाखांच्या गाड्या, शहरात सदनिका, नातेवाईकांच्या नावाने भुखंड कसे आले असा प्रश्न उपस्थित केला आहे. चोरी करण्यासाठी अक्कल लागते तर शिकलेल्या व्यक्तींकडे ती उपजतच असते. गोरगरीब लोकांवर गुन्हे दाखल करून उशीर व शिकलेल्या अधिकाऱ्यांची ही भ्रष्टाचाराची किड देशाला पोकरत आहे असे लिहिले आहे. सोबतच सुनिल पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांना उल्लेखीत केलेल्या निवेदनात आपल्यास सत्य आढळत असेल तर आपल्याकडून योग्य ती कार्यवाहीची मी अपेक्षा करतो असे लिहिले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *