नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड जिल्हा पोलीस दलात सुर्याजी पिसाळ, मिर सादीक, मिर जाफर या वृत्तीचे अनेक लोक कार्यरत आहेत. याचे लिखाण आम्ही नेहमीच प्रसिध्द केले आहे. आज न्यायालय परिसरात सुध्दा अशा वृत्तींचे व्यक्ती जगतात अशी खळबळजनक माहिती प्राप्त झाली आहे.
न्यायालयात काम करणारे न्यायाधीश हे आपल्या पैकृत गावाला सोडून दुर असतात. त्यांच्यावर कायद्याची जबाबदारी आहे, कायद्याच्या चौकटीत राहुन त्यांच्या समक्ष आलेल्या खटल्यांचा निका देण्याची जबाबदारी त्यांच्यावर असते. ही जबाबदारी पार पाडतांना तक्रारदार नाराज होवू नये, आरोपी नाराज होवू नये, आरोपींच्या वकीलांना आपल्या कामावर काही आक्षेप नसावा. सोबत आपल्या सोबत काम करणारे सहकारी आनंदीत असावेत याचीही जबाबदारी त्यांच्यावर असते. हे सर्व दिव्य पार पाडतांना त्यांना अनेक कटकटीतून जावे लागते. प्रसंगी त्यांच्याविरुध्द उच्च न्यायालयाकडे अर्ज पाठवले जातात. त्या अर्जावर उच्च न्यायालय अत्यंत सखोलपणे माहिती जमा करते आणि त्या अर्जाचा निकाल लावला जातो. असाच एक अर्ज नांदेड न्यायालयाच्या न्यायाधीशाविरुध्द पाठविण्यात आला होता. पण त्यात कांही मोठे यश आले नाही म्हणून नवीनच खलबत रचण्यात आले.
या खलबतामध्ये सामील झालेली सुर्याजी पिसाळ, मिर सादीक आणि मिर जाफर यावृत्तीची माणसे कोण आहेत हे शोधणे आवश्यक आहे. कारण आता न्यायालयासमक्ष मकोका कायद्याचा खटला क्रमांक 94, 95 आणि 154/2020 असे तीन महत्वपूर्ण खटले सुरू आहेत. ज्यामध्ये अनेक गुंडांसह पोलीस अधिकारी विनोद दिघोरे आणि राजकीय व्यक्ती विरेंद्र उर्फ विरु भंडारी असे महान लोक तुरूंगात आहेत. तुरूंगात आरोपींसाठी आपल्याला घरात मिळणार अशा काटेकोर वेळेत न्याहारी, जेवण, दुध,फु्रट या सुविधांसह शावरची बाथरुमस् आहेत. त्यांना केबल टी.व्ही. पाहायला मिळतो. असंख्य वर्तमानपत्र वाचायला मिळतो. तेथे वाचनालय आहे अशा अनंत सुविधा आहेत. नांदेड न्यायालयात कांही दिवसांपासून जेलमध्ये असलेल्या आरोपींपैकी कांही जणांनी दररोज नवीन अर्ज फाटे करायला सुरूवात केली आहे. यामुळे तुरुंग प्रशासन सुध्दा त्रासले आहे. ते न्यायालयांकडे वेळोवेळी मदत मागत असतात पण सर्वच मागण्या पुर्ण होतील असे नसते. आता तर न्यायालय बदलून हवे असा एक अर्ज आला आहे त्या अर्जावर तुरूंगात असणाऱ्या निलंबित पोलीस निरिक्षक विनोद दिघोरेचे नाव अर्जदार म्हणून आहे. यासोबत आलेल्या इतर अनेक अर्जांमध्ये एकाच माणसाने अनेक अर्ज लिहिले आहेत असे प्रथमदर्शनी दिसते.
हे खलबत कोणी सुरू केले, त्यांचा उद्देश काय ? याचा शोध होण्याची नक्कीच गरज निर्माण झाली आहे. अशा अर्जफाट्यांमुळे न्यायालयांना आपले काम करण्यात अनेक अडचणी उभ्या राहु शकतात. या मुद्याला शोधूनच न्यायालय परिसरात वावरणाऱ्या सुर्याजी पिसाळ, मिर जाफर, मिर सादीक वृत्तीच्या लोकांनी हे खलबत घडविले असावे अशी चर्चा न्यायालय परिसरात सुध्दा सुरू आहे.
न्यायालय परिसरात सुध्दा सुर्याजी पिसाळ, मिर सादीक, मिर जाफर वृत्तीची मंडळी न्यायालयांविरुध्द खलबते रचतात ?