नांदेड,(प्रतिनिधी)- नांदेड जिल्हा दलातील पोलीस अधीक्षक मुख्यालय हे पद मागील काही महिन्यांपासून प्रभारी पदावर चालत होते.आता राज्य शासनाच्या गृह विभागाने १७ फेब्रुवारी रोजी निर्गमित केलेल्या आदेशानुसार नांदेडच्या मुख्यालय पोलीस उप अधीक्षक पदावर अश्विनी जगताप यांची नियुक्ती झाली आहे.
मागील अनेक महिन्यांपासून नांदेड जिल्हा पोलीस दलातही पोलीस उप अधीक्षक मुख्यालय हे पद प्रभारी अधिकारीच चालवत आहेत.राज्याच्या गृह विभागाचे सह सचिव व्यंकटेश भट यांच्या डिजिटल स्वाक्षरीने निर्गमित करण्यात आलेल्या आदेशानुसार अश्विनी रामदास जगताप यांची नियुक्ती नांदेड जिल्हा मुख्यालय पोलीस उप अधीक्षक पदावर करण्यात आली आहे. जगताप यांची बदली सहायक पोलीस आयुक्त नागपूर शहर येथे आदेशाधिन होती.आता त्यात सुधारणा करण्यात आली आहे.परिवीक्षाधीन पोलीस अधिकाऱ्यांच्या सदरात हि बदली शासनाने केली आहे.मुख्यालय पदावर बहुदा अनुभवी पोलीस उप अधीक्षक नियुक्त केला जातो.पण गृह विभागाने परिवीक्षाधीन अधिकाऱ्याची नियुक्ती केली आहे.त्यामुळे त्यांचा प्रशिक्षण कालावधी शिल्लक असेल तर पुन्हा नांदेड पोलीस दलातील पोलीस उप अधीक्षक मुख्यालय हे पद प्रभारी अधिकारीच चालवणार हे निश्चित आहे.महाराष्ट्र शासनाने आपला हा निर्णय संकेतांक २०२२०२१७२१३००९००२९ नुसार राज्याच्या संकेत स्थळावर प्रसिद्ध केला आहे.