नांदेड(प्रतिनिधी)-जुना कौठा नांदेड येथील प्रसिध्द लेख, कवी, संत साहित्याचे अभ्यासक प्रा.डॉ.बा.दा.जोशी यांचे आज पुणे येथे 79 व्या वर्षी निधन झाले आहे. त्यांच्यावर उद्या अंतिमसंस्कार करण्यात येणार आहेत.
पैठण येथील संत कवी श्री.उत्तमश्र्लोक, माहुर येथील विष्णुदास यांचे संशोधन व अभ्यास असणाऱ्या डॉ.बा.दा.जोशी यांनी गोपीकाबाई सिताराम गांवडे महाविद्यालय उमरखेड येथे उपप्राचार्य म्हणून काम केले. ते मराठी विभागाचे प्रमुख होते. सर्व विद्यार्थ्यांचे आवडते प्राध्यापक म्हणून त्यांची ख्याती होती. अमरावती विद्यापीठ मराठी प्राध्यापक परिषद पुसदचे अध्यक्ष पद त्यांनी भुषवले. नांदेडच्या होळी भागातील साकळे विद्यालय व रेणुकामाता विद्यालयाचे ते संचालक होते. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात व यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठात त्यांनी विद्यावास्पतीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करुन अनेक विद्यावास्पती घडवले. विविध वर्तमानपत्रांमध्ये भरपूर लेखण केले. ग्राहक संरक्षण परिषदेचे अशासकीय सदस्य, ग्राहक पंचायत महाराष्ट्र शाखा नांदेडचे प्रबोधन प्रमुख म्हणून त्यांनी काम केले. वसुधैव कल्याणकारी ज्येष्ठ नागरीक संघ जुना कौठा या संस्थेचे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिजे. प्रा.आनंद कृष्णापूरकर आणि इंजि.प्रसाद कृष्णापूरकर यांचे ते वडील आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी डॉ.वसुधा जोशी, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. एका अभ्यासकाच्या शांत होण्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.
