नांदेड(प्रतिनिधी)-एक महिन्यापुर्वी नांदेड ग्रामीणचे पोलीस निरिक्षक अशोक घोरबांड आणि त्यांचे सहकारी सहाय्यक पोलीस निरिक्षक संकेत दिघे यांच्यासह इतर पोलीसांनी मारहाण केल्याची तक्रार आरोपीने केली होती. आज एका महिन्यानंतर सुट्टीतील न्यायालयाकडे या आरोपीला पोलीस कोठडी मागण्यासाठी हजर केल्यानंतर अटकेच्या दिवशीपासून 14 दिवसांपर्यंतच पोलीस कोठडी मागता येते. हे माहित नाही काय? असा प्रश्न न्यायालयाने पोलीस निरिक्षक अशोक घोरबांड यांना विचारला. त्यानंतर त्या आरोपीला पोलीस कोठडी मागणी करण्याचा नांदेड ग्रामीण पोलीसांचा अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला आहे. या प्रकरणात आरोपीने पोलीसांच्या केलेल्या तक्रारीचा निकाल सुध्दा अजुन लागलेला नाही.
नांदेड ग्रामीण पोलीसांनी भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या गुन्हा क्रमांक 268/2021 मध्ये न्यायालयीन कोठडीत असलेला आरोपी बलप्रितसिंघ उर्फ आशिष नानकसिंघ सपुरे याच्यासाठी 18 जानेवारी 2022 रोजी न्यायालयाकडून हस्तांतरण वॉरंट मिळवले. 18 जानेवारी रोजी आशिष सपुरेला 665/2021 या नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यातील दरोडा प्रकरणात अटक करण्यात आली. त्यानंतर 24 तासाच्या आत म्हणजे 19 जानेवारी 2022 रोजी आशिष सपुरेला न्यायालयात आणण्यात आले. त्यावेळी आशिष सपुरे एकच नव्हे तर भाग्यनगर येथील गुन्हा क्रमांक 268 मधील अनेक आरोपी सुध्दा त्याच्यासोबत होते.
न्यायालयासमक्ष फक्त बलप्रितसिंघ उर्फ आशिष नानकसिंघ सपुरे याने नांदेड ग्रामीण पोलीसचे पोलीस निरिक्षक अशोक घोरबांड, सहाय्यक पोलीस निरिक्षक संकेत दिघे आणि तीन नाव माहित नसलेले पोलीस यांनी मला जबर मारहाण केली आहे. अशी तक्रार केली. या तक्रारीवरुन न्यायालयाने आपल्या खाजगी कक्षात आशिष सपुरेच्या जखमांची पाहणी केली. त्यावेळी आशिष सपुरेचे वकील ऍड.मनप्रितसिंघ ग्रंथी यांनी न्यायालयाकडे तक्रार केली की, सन्माननिय, आदरनिय, जबरदस्त पोलीस निरिक्षक श्री.अशोकरावजी घोरबांड साहेब आरोपीला धमक्या देत आहेत. त्यानंतर न्यायालयाने आशिष सपुरेचा जबाब नोंदवून घेतला. आणि त्यास वैद्यकीय उपचारासाठी पाठवले. वैद्यकीय उपचाराचा अहवाल आला तेंव्हा आशिष सपुरेच्या शरिरावरील जखमा तीन ते चार दिवस जुन्या आहेत असे लिहुन आले. नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतच श्री.शंकररावजी चव्हाण शासकीय रुग्णालयाचे वास्तव्य आहे. 19 जानेवारी रोजी न्यायालयाने आपल्या कोठडीत घेतलेल्या आशिष सपुरेचे 18 फेबु्रवारी रोजी पुन्हा हस्तांतरण वॉरंट मागण्यात आले. न्यायालयाने ते मंजुरपण केले. 19 फेबु्रवारी रोजी आशिष सपुरेला पोलीस कोठडी मिळण्यासाठी पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले. पण 19 फेबु्रवारी सुट्टीच्या दिवशी न्यायालय बदललेले होते. त्यावेळी आशिष सपुरेचे वकील ऍड.रशिद पटेल यांनी न्यायालयासमक्ष सादरीकरण केले की अटकेच्या 14 दिवसांच्या आत पोलीस कोठडी, न्यायालयीन कोठडी ही प्रक्रिया पुणृ होणे आवश्यक असते. आता आशिष सपुरेच्या गुन्हा क्रमांक 665 मधील अटकेला एक महिना एक दिवस झाला आहे. म्हणून त्यास पोलीस कोठडी देता येणार नाही. यावर न्यायालयाने अत्यंत अभ्यासक पोलीस निरिक्षक श्री अशोकरावजी घोरबांड यांना ऍड.रशिद पटेल यांनी सादर केलेल्या सादरीकरणाबद्दल प्रश्न विचारला. त्यावर श्री.अशोकरावजी घोरबांड यांनी भरपूर मोठे लांबलचक उत्तर दिले. यानंतर न्यायालयाने आदेश केला की, आशिष सपुरेला नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यातील गुन्हा क्रमांक 665/2021 मध्ये पोलीस कोठडी देता येणार नाही. या आदेशाने आशिष सपुरेची रवानगी न्यायालयीन कोठडीत अर्थात तुरूंगात झाली आहे अशी माहिती ऍड.मनप्रितसिंघ ग्रंथी यांनी वास्तव न्युज लाईव्हला दिली.
अभ्यासक पोलीस निरिक्षक अशोकरावजी घोरबांड यांना दरोडेखोर आशिष सपुरेची पोलीस कोठडी मिळवता आली नाही