
उच्च पदस्विकारल्यावर मार्गदर्शनाच्या नावावर अनेक युवतींवर अत्याचार केले
नांदेड(प्रतिनिधी) -नांदेडच्या मातीत जन्मलेल्या आणि विद्यार्थी दशेत अत्यंत गुणवत्तापुर्ण कामगिरी करून तेलंगणा राज्यात सन 2012 मध्ये आयएएस केडर प्राप्त करणाऱ्या व्यक्तीविरुध्द दिल्ली पोलीसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर त्यास पटीयाला हाऊस न्यायालयाने जामीन नाकारला आहे. तरीपण आजही हा आयएएस अधिकारी सदस्य सचिव बॉयोडायव्हर सिटी बोर्ड या पदावर कार्यरत आहे. नांदेडच्या एका व्यक्तीने एवढ्या उच्च पदावर असतांना केलेले हे कृत्य मागिल सात वर्षापासून सुरू होते. त्यावेळी आजची महिला अल्पवयीन बालिका होती.
एका महिलेने दुरध्वनीवरुन दिलेल्या माहितीनुसार नांदेड येथील वसरणी भागात राहणारा कालीचरण सुदामराव खरतडे या माणसाने तिला सन 2013 मध्ये मैत्री करण्याची विनंती केली. त्यावेळी ही बालिका अल्पवयीन होती. सामाजिक संकेतस्थळावर झालेली ओळख कायमच राहिली आणि पुढे या युवती झालेल्या त्या बालिकेला युपीएससी परिक्षा देण्याचे ध्येय दिसले आणि ती त्यावर काम करू लागली. नांदेड येथील राहणारा आयएएस अधिकारी कालीचरण सुदामराव खरतरे हा तेलंगणा राज्यातून बदलून दिल्ली येथील तेलंगणा हाऊसमध्ये ओएसडी या पदावर कार्यरत झाला आणि पुन्हा त्याने या युवतीशी संपर्क साधला. सप्टेंबर 2018 मध्ये कालीचरण खरतडेने या युवतीला तेलंगणा हाऊसमध्ये बोलवले आणि तिच्यावर अत्याचार केला. घडलेला प्रकार युवतीला कळला होता की, हा चुकीचा प्रकार आहे. तिने आपल्या वडीलांना हा प्रकार सांगितला आणि त्या युवतीच्या कुटूंबियांनी तेलंगणा हाऊसमध्ये त्यावेळी मोठा धिंगाणा केला. तेंव्हा या युवतीकडे कालीचरण खरतडेने माफी मागितली आणि सोबतच तुझे ऑफसिन फोटोज, व्हिडीओज मी व्हायरल करेल अशी धमकी दिली. झालेल्या प्रकाराने परत त्याला तेलंगणा राज्यात पाठविण्यात आले.
त्यानंतर सुध्दा कालीचरण या युवतीला तुझ्या कॉलनीमध्ये तुझी बदनामी करेल, तुझे फोटो पाठवेल असे सांगत होता. या कालीचरणने मला आणि माझ्या वडीलांना गुंडांकडून सुध्दा धमक्या दिल्या असे सांगते. अखेर सन 2019 मध्ये मी तुझ्यावर प्रेमकरतो असे या 46 वर्षीय आयएएस अधिकाऱ्याने 23 वर्षीय युवतीला सांगितले आणि कांही बनावटपणा करून तिला पटना बिहार येथे नेले आणि तिच्यासोबत ल ग्न केले. लग्नानंतर सुरू असलेल्या प्रकारात या युवतीला आयएएस अधिकारी कालीचरण खरतडेने माझे दोन लग्न झालेले आहेत. अशी भुमिका घेतली. शासनाच्या परवानगी विना, सक्षम कारण असल्याशिवाय दोन लग्न करणाऱ्या शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना नोकरीतून काढून टाकले जाते. तरी कालीचरण खरतडे हा आजही तेलंगणा राज्यात मोठ्या पदावर कार्यरत आहे.
यानंतर त्या युवतीने महिला आयोग दिल्ली येथे तक्रार दिल्यानंतर तिलक मार्ग पोलीस ठाणे दिल्ली यांनी आयएएस अधिकाऱ्यांविरुध्द गुन्हा दाखल केला. या गुन्ह्यात भारतीय दंड संहितेची कलमे 376, 354, 354(अ), 354(ड) आणि 506 तसेच 495 जोडण्यात आले आहे. तिलक मार्ग पोलीस ठाण्याने हा गुन्हा दाखल करून आयएएस अधिकाऱ्याला अटक न करता त्याच्याविरुध्द न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले आहे. आयएएस अधिकारी कालीचरण खरतडेने मागितलेला जामीन दिल्ली महानगर न्यायदंडाधिकाऱ्यांनी फेटाळलेला आहे.
या युवतीने सांगितल्याप्रमाणे कालीचरण खरतडेने माझ्याच जीवनात काळोख पसरविला असे नाही. त्याने असे प्रकार अनेक युवतींसोबत केलेले आहेत. या युवतीला युपीएससी मार्गदर्शन करण्याच्या थापा मारून कालीचरणने हे प्रकार घडवले आहेत. मला जेंव्हा तो लग्न झालेला व्यक्ती आहे आणि त्याला दोन मुले आहेत हे माहित झाल्यावर त्याने मला विश्र्वास द्यायचा प्रयत्न केला की, मी फक्त तुझ्यावर प्रेम करतो, पहिल्या पत्नीसोबत मला घटस्फोट घ्यायचा आहे पण ती 50 कोटी रुपये मागत आहे असे सांगितले होते. पण त्याच्या नावाप्रमाणे तो कालीचरणच आहे. आता मी कोणत्याही परिस्थितीत माघार घेणार नाही. उच्च पद स्विकारून आपल्या पदाचा गैरफायदा घेणाऱ्या या व्यक्तीला धडा शिकविण्याचा उद्देश मी निश्चित केला आहे असे ती युवती म्हणाली.