नांदेड(प्रतिनिधी)-25 लाखांची खंडणी मागणाऱ्या तीन खंडणीखोरांना हदगाव पोलीसांनी स्थानिक गुन्हा शाखेच्या मदतीने पकडल्यानंतर प्रभारी न्यायालयाने या तिघांना पोलीस कोठडीत पाठविले आहे.
दि.7 फेबु्रवारी रोजी हदगाव येथील श्रीनिवास दमकोंडवार यांना कोणी तरी फोन करून 25 लाख रुपयांची खंडणी मागितली. खंडणी दिली नाही तर तुझ्या कुटूंबातील लेकरांना समाप्त करू अशी धमकी दिली होती. त्यानुसार हदगाव पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 35/2022 दाखल झाला. या गुन्ह्याचा तपास पोलीस निरिक्षक हणमंत गायकवाड यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरिक्षक गोविंद खैरे यांच्याकडे देण्यात आला होता.
स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक द्वारकादास चिखलीकर यांना मिळालेल्या माहितीच्या आधारावर त्यांनी आपले पथक हदगाव येथे पाठवले. तेथे पोलीस उपनिरिक्षक गोविंद खैरे, हदगावचे पोलीस अंमदार वाडेकर, भारत गायकवाड आणि ज्योती सुर्यवंशी यांनी स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकासोबत हदगाव येथे उस्मानशाह उर्फ दादु फत्ताशाह (23) रा.मुल्लागल्ली हदगाव, करीमोद्दीन अजीमोद्दीन काझी (71) रा.हदगाव, शेख रहिम अबुबकर सिद्दीकी (24) रा.हदगाव या तिघांना ताब्यात घेतले आणि त्यांच्याकडून माहिती घेतली असता त्यांनी 25 लाख रुपये दिले नाही तर दमकोंडवारच्या दोन मुलांना मारून टाकण्याची धमकी दिल्याची कबुली दिली.
ही कार्यवाही स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस उपनिक्षिक आशिष बोराटे, पोलीस अंमलदार गंगाधर कदम, संजीव जिंकलवाड, बालाजी तेलंग, विठ्ठल शेळके, विलास कदम, महेश बडगु, राजेश सिटीकर, बालाजी यादगिरवाड, रवि बाबर आणि अर्जुन शिंदे यांनी पार पाडली.
आज 20 फेबु्रवारी रोजी पोलीस उपनिरिक्षक गोविंद खैरे यांनी पकडलेल्या तिघांना प्रभारी न्यायालयात हजर करून पोलीस कोठडीची मागणी केली. ती न्यायालयाने एक दिवसासाठी मंजुर केली आहे.
25 लाखांची खंडणी मागणारे तिघे पोलीस कोठडीत