नांदेड(प्रतिनिधी)-हिमायतनगर गावात एक दरोडा घडला आहे ज्यात दोन तोळ्याची सोन्याची चैन आणि तीन ते चार हजार रुपये रोख घेवून दरोडेखोऱ्यांनी जीवघेणा हल्ला केला आहे. जवळगाव ता.हिमायतनगर येथे जिल्हा परिषदेची शाळा फोडून 53 हजारांचा ऐवज लंपास झाला आहे. बिलोली येथे पत्राकाढून घरातून 56 हजारांचा ऐवज चोरीला गेला आहे. भोकर शहरातून एक दुचाकी चोरीला गेली आहे. तसेच बिलोली तालुक्यातील कासराळी येथून 75 हजार रुपये किंमतीचे तीन बैल चोरीला गेले आहेत.
हिमायतनगर येथील प्रशांत आनंदराव देवकत्ते या व्यापाऱ्याने दिलेल्या तक्रारीनुसार 20 फेबु्रवारी रोजी 11 ते 12 या वेळेदरम्यान सुरभी बेकरी समोरच्या रस्त्यावर संतोष बागुराव बंजेवाड यांनी त्याला थांबवले आणि तुला लई मस्ती आली, तुला पैसे जास्त झाले असे सांगून त्यांच्या गळ्यावर जिवे मारण्याच्या उद्देशाने जखम केली. तसेच त्यांच्या गळ्यातील दोन तोळे सोन्याची चैन आणि तीन ते चार हजार रुपये रोख रक्कम बळजबरीने काढून घेतली. हिमायतनगर पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून सहाय्यक पोलीस निरिक्षक चौधरी अधिक तपास करीत आहेत.
जवळगाव ता.हिमायतनगर जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक दिपक शंकरराव झांबरे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 15 फेबु्रवारीच्या सायंकाळी 4 ते 20 फेबु्रवारीच्या दरम्यान कोणी तरी चोरट्यांनी शाळेचे कुलूप तोडून जुने जनरेटर, बॅटऱ्या आणि एलईडी टी.व्ही. असा 53 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. हिमायतनगर पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस अंमलदार रमेश केंद्रे अधिक तपास करीत आहेत.
बिलोली शहरातील सय्यद फिरदोस सय्यद कौसर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 19-20 फेबु्रवारीच्या दरम्यान त्यांच्या घरावरील बाथरुमवर असलेला पत्रा कोणी तरी चोरट्यांनी काढून आत प्रवेश केला आणि घरातील सोन्या-चांदीचे दागिणे व रोख रुपये तसेच कागदपत्र असा 56 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. बिलोली पोलीसांंनी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस अंमलदार सोनकांबळे अधिक तपास करीत आहेत.
मौजे कासराळी ता.बिलोली येथील अमृतधाम गोशाळेतून दि.19 फेबु्रवारीच्या सायंकाळी 5 ते 20 फेबु्रवारीच्या पहाटे 5.30 वाजेदरम्यान कोणी तरी चोरट्यांनी 75 हजार रुपये किंमतीचे तीन बैल चोरून नेले आहेत. सुर्यकांत शंकरराव ईबितवार यांच्या तक्रारीवरुन बिलोली पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस अंमलदार जी.बी.शिंदे अधिक तपास करीत आहेत.
दिगंबर रतन गिरी रा.कोलंबी यांनी आपली दुचाकी गाडी क्रमांक एम.एच.26 जे.सी.18 फेबु्रवारी रोजी कोलंबी बसस्थानकासमोर उभी केली. अर्ध्या तासातच त्यांची 65 हजार रुपये किंमतीची गाडी चोरीला गेली. भोकर पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस अंमलदार वाघमारे अधिक तपास करीत आहेत.
हिमायतनगर दरोडा, घरफोडी ; बिलोलीत तीन बैल चोरी आणि एक घरफोडी