योजनेतील थकबाकी रक्कमा व्याजासह मार्च अखेर पर्यंत मिळणार
नांदेड(प्रतिनिधी)-परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन(डीसीपीएस) योजनेतील 1 जानेवारी 2006 ते 31 मार्च 2009 या कालावधीतील थकबाकी स्तर-2 मध्ये जमा असलेली रक्कम व त्यावरील व्याज प्रदान करण्यास मान्यता देण्यात आली आहे. ही कार्यवाही मार्च 2022 पर्यंत पुर्ण करण्यात यावी असा शासन निर्णय महाराष्ट्र राज्याच्या वित्त विभागाने जारी केला आहे. या निर्णयावर वित्तविभागाचे उपसचिव रमाकांत घाटगे यांची डिजिटल स्वाक्षरी आहे.
परिभाषिक अंशदान निवृत्ती वेतन योजना 2006 पासून लागू झालेली आहे. त्यात सहा वेतन आयेागाच्या स्तर-2 मध्ये जमा असलेल्या थकबाकीच्या रक्कमा व्याजासह परत करण्याची कार्यवाही प्रलंबित होती. यासाठी शासनाने ही कार्यवाही मार्च 2022 अखेरपर्यंत पुर्ण करण्यासाठी राज्यातील अधिकाऱ्यांना विविध सुचना दिल्या आहेत. या थकबाकी रक्कमांवरील व्याज वेळोवेळी असलेल्या व्याजदराप्रमाणे देय राहतील असे या आदेशात लिहिले आहे.
शासनाचा हा निर्णय जिल्हा परिषदा, मान्यता प्राप्त व अनुदानित अशासकीय प्राथमिक व माध्यमिक शाळा, कृषीतर विद्यापीठे व त्यांच्याशी संलग्नीक कृषी विद्यापीठे यामध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना योग्य फेरफारासह लागू राहतील. याबाबतचे स्वतंत्र आदेश संबंधीत मंत्रालयीन प्रशासकीय विभागांनी निर्गमित करायचे आहेत. परिभाषीत अंशदान निवृत्ती वेतन योजनेतील / राष्ट्रीय निवृत्त वेतन योजनेतील शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे. राज्य शासनाने आपला हा निर्णय संकेतांक 202202231654433705 नुसार राज्याच्या संकेतस्थळावर प्रसिध्द केला आहे.
परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजनेतील कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी