नांदेड,(प्रतिनिधी)- राज्यातील सर्व सेवानिवृत्त पोलीस अंमलदारांना त्यांच्या सर्व कुटुंबियांसह महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ मिळणार आहे.त्यासाठी प्रत्येक पोलीस घटक प्रमुखांनी या बाबतची सर्व माहिती २५ फेब्रुवारी पर्यंत पोलीस महासंचालक कार्यालयास पाठवण्यासाठी कळविण्यात आले आहे.
पोलीस महासंचालक कार्यलयातील कार्यालय अधीक्षक मनीषा पवार यांनी स्वाक्षरी करून निर्गमित केलेल्या पत्रानुसार राज्यातील सर्व सेवा निवृत्त पोलीस अंमलदार (पोलीस शिपाई ते सहायक पोलीस उप निरीक्षक) यांना शासनाच्या महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन आहे.
त्यासाठी राज्यातील सर्व पोलीस घटक प्रमुखांनी आपल्या कार्यालयातील निवृत्ती वेतन घेणाऱ्या सर्व पोलीस अमलदारांची माहिती त्या पोलीस अमलदाराचे सेवानिवृत्ती पद आणि त्यांच्या कुटुंबातील एकूण सदस्यांची संख्या अश्या रकान्यात सविस्तर माहिती २५ फेब्रुवारी पर्यंत पोलीस महासंचालक कार्यालयाच्या मेल वर पाठवण्यास कळविले आहे.