नांदेड(प्रतिनिधी)-पोलीस दलात किमान 30 वर्ष सेवा पुर्ण असलेले आणि सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक पदावर किमान तीन वर्ष सेवा आणि आश्वासित प्रगती योजनेनुसार पोलीस उपनिरिक्षक संवर्ग पदाची वेतन श्रेणी घेत असलेले तीन निकष पुर्ण करणारे सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक संवर्गातील पोलीस अंमलदार आता पोलीस उपनिरिक्षक झाले आहेत. राज्य शासनाने पोलीस नाईक पदाची 38 हजार 169 पदे निरसित (समाप्त) केली आहेत. आता पोलीस दलात पोलीस अंमलदार या पदानुसार पोलीस शिपाई, पोलीस हवालदार आणि सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक एवढीच पदे राहतील.
आश्वासित प्रगती योजना सातव्या वेतन आयोगात लागू करण्यात आली त्यानुसार 10, 20 आणि 30 वर्षाच्या पोलीस सेवेनंतर त्यापेक्षा वरच्या पदाची वेतनश्रेणी मिळू लागली. पण प्रत्यक्षात ते पद प्राप्त होत नव्हते. विविध अटी आणि कार्यप्रणालीनुसार अनेक सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक त्यांना पद प्राप्त झाल्यानंतर 3 वर्षाच्या आत सेवानिवृत्त होवू लागले. बरेच पोलीस हवालदार त्याच पदावर सेवानिवृत्त होवू लागले. या सर्व प्रकारामुळे पोलीस उपनिरिक्षक या पदावर पोहचण्याचे पोलीस कर्मचाऱ्यांचे स्वप्न अर्धवटच राहत होते. शिवाय विभागीय परिक्षा आणि त्यातील नियम यामुळे अनेक अडचणी होवू लागल्या. म्हणून बरेच पोलीस अंमलदार न्यायालयात गेले. त्या संबंधाच्या रिट याचिका प्रलंबित होत्या. न्यायालयाने आपल्या रिट याचिका क्रमांक 4078/2015 मध्ये निर्णय दिला आणि त्यातील परिच्छेद क्रमांक 60 आणि 61 मध्ये नमुद केले की, आश्वासीत प्रगती योजनेअंतर्गत प्रत्यक्ष पदोन्नतीसाठी लागणारा विलंब दुर केल्यास पोलीस अंमलदारांचे मनोधैर्य उंचावून कार्यक्षमतेत वाढ होईल आणि पोलीस दलाच्या कामात जास्त प्रगती होईल. पोलीस शिपाई या पदावर भरती झालेला व्यक्ती 24 वर्षानंतर पोलीस हवालदार बनतो. या सर्व बाबींवर विचार करून राज्य शासनाच्या गृह विभागाने राज्यभरात पोलीस नाईक संवर्गाची 38 हजार 169 पदे निरसीत (समाप्त) केली आहेत आणि आश्वासित प्रगती योजनेनुसार सहाय्यक पोलीस उपनिरिक्षकांना पोलीस उपनिरिक्षक हे पद त्वरीत देण्यास सांगितले आहे.
आज राज्यात पोलीस शिपाई 85039 आहेत. आता नवीन पुर्नरचनेत 108058 झाली आहेत. पोलीस हवालदार 37861 आहेत. आता त्यांची संख्या पुर्नरचनेने 51210 झाली आहे. सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक 15270 आहेत. त्यात वाढ झाली असून ती संख्या आता 17071 झाली आहे. पोलीस उपनिरिक्षक पदोन्नती कोटा ही पदे आता 4869 आहेत. अशा प्रकारे राज्यात पोलीस अंमलदारांची एकणू संख्या 181208 आहे. त्यातील पोलीस नाईक पदाची 38169 पदे समाप्त झाली आहेत.
या आता 31 डिसेंबर 2023 नंतर विभागीय परिक्षा संदर्भाची मागणी लोकसेवा आयोगाकडे पाठवली जाणार नाही त्यामुळे पोलीस शिपाई म्हणून भरती होणाऱ्या प्रत्येकाला पोलीस उपनिरिक्षक पद मिळणारच हे निश्चित झाले आहे. हा शासन निर्णय गृह विभागाचे सह सचिव राहुल कुलकर्णी यांच्या डिजिटल स्वाक्षरी सह संकेतांक क्रमांक 202202251821123429 नुसार शासनाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे. पदोन्नतीच्या या लढाईमध्ये पोलीस सेवेतुन सेवानिवृत्त झालेले पोलीस उपनिरिक्षक मुकूंद दायमा यांनी सुध्दा उच्च न्यायालयात, शासन दरबारी, पोलीस महासंचालक कार्यालयात पदोन्नतीच्या या लढाईसाठी भरपूर पुढाकार घेतलेला आहे.