एकलव्य इंग्रजी शाळेतील विद्यार्थी,पालकात हाणामारी; दोन मोटार सायकल जाळल्या

मुख्याध्यापक जखमी….तर तीन मोटार सायकलचा चुराडा….
ईस्लापुर(प्रतिनिधी)- अतिदुर्गम आदिवासी किनवट तालुक्यातील प्रसिद्ध असलेले सहस्त्रकुंड येथील एकलव्य मॉडेल रेसिडेंशियल स्कूल मध्ये विद्यार्थी, पालक व शिक्षकांमध्ये हाणामारी होऊन त्यात दोन मोटरसायकल जाळण्यात आल्या तर तीन मोटरसायकलचा चुराडा करण्यात आला आहे.
         या हाणामारी मध्ये शिक्षक, विद्यार्थी व पालक जखमी झाल्याची घटना आज दि. 27 रोजी घडली आहे. या बाबत सविस्तर वृत्त असे की दि. 26 रोजी सातवी आठवी मधील विद्यार्थ्यांनी बारावीमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांच्या पेटी मधून काहीतरी चोरल्याच्या संशयावरून सातवी, आठवी मधील शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची बारावीतील विद्यार्थ्यांनी मारहाण केली. विद्यार्थ्यांनी घडलेला प्रकार पालकांना सांगताच पालक शाळेमध्ये येऊन आमच्या पाल्यास का मारहाण केली अशी विचारपूस करण्याच्या कारणा वरुन पालकांमध्ये व विद्यार्थ्यांमध्ये  हाणामारी होऊन विद्यार्थ्यांनी पालकांच्या दोन मोटरसायकली जाळल्या तर तीन मोटरसायकलचा चुराडा केला.
                              दरम्यान शिक्षकांनी सोडवण्याचा प्रयत्न केला असता शिक्षकांना मारहाण करून हात मोडल्याची घटना घडली आहे.  घटनेचे वृत्त कळताच प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी कीर्तिकुमार पुजार, उपविभागीय पोलिस अधिकारी विजय डोंगरे,सहायक पोलीस निरीक्षक शंकर डेडवाल यांनी घटनेच्या ठिकाणी भेट देऊन पालकांना व विद्यार्थ्यांना शांततेचे आवाहन केले. जो कोणी या प्रकरणात दोषी असेल तर त्यांच्या विरुद्ध कडक कार्यवाही करण्यात येईल अशी माहिती सहाय्यक जिल्हाधिकारी किर्तिकुमार पुजार यांनी दिली.
                 यावेळी जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ जनाबाई डुडुळे,गगाराम गड्डमवाड,पं.स.सदस्या सुरेखा वानोळे,शेषेराव ढोले यांनी सुद्धा पालकांना व विद्यार्थ्यांना शांततेचे आवाहन केले व बारावीत शिक्षण घेणाऱ्या बीड जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना तात्पुरते त्यांच्या मूळ गावी पाठविण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *