नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड शहरात वेगवेगळे गुन्हे करुन समाजात अशांतता निर्माण करणाऱ्या एका गुन्हेगाराला स्थानिक गुन्हा शाखेच्या प्रस्तावानंतर नांदेड, हिंगोली आणि परभणी या तीन जिल्ह्यातून हद्दपार केल्याची नोटीस तामील करण्यात आली आहे. हा गुन्हेगार विमानतळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत वास्तव्यास आहे.
नांदेड शहरात वेगवेगळे गुन्हे करून समाजात अशांतता निर्माण करणारा गणेश अमरसिंह ठाकूर रा.गुरूनगर, कर्मविरनगर नांदेड याच्याविरुध्द दाखल असलेल्या विविध गुन्ह्यांची यादी एकत्र करून विमानतळचे पोलीस निरिक्षक संजय ननवरे, त्यांचे सहकारी सहाय्यक पोलीस निरिक्षक बाळू गिते, पोलीस अंमलदार बाबा गजभारे, दारासिंग राठोड, दत्तात्रय गंगावरे यांनी या गुन्हेगाराविरुध्दची सर्व कागदपत्रे एकत्रीत करून त्याच्याविरुध्द सर्व अहवाल पोलीस अधिक्षक कार्यालयात पाठविला.
पोलीस उपअधिक्षक मुख्यालय डॉ.अश्विनी जगताप यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक द्वारकादास चिखलीकर यांनी गणेश अमरसिंह ठाकूर विरुध्द उपविभागीय दंडाधिकारी विकास माने यांच्याकडे हा प्रस्ताव पाठवला की, या गुन्हेगाराला नांदेड शहरात लगत असलेल्या तीन जिल्ह्यांमधून हद्दपार करावे कारण याच्यामुळे समाजात अशांतता पसरली आहे. हा प्रस्ताव उपविभागीय दंडाधिकारी विकास माने यांनी मान्य केला आणि गुन्हेगार गणेश अमरसिंह ठाकूर यास नांदेड, हिंगोली आणि परभणी या तीन जिल्ह्यांमधून हद्दपार करण्याची नोटीस विमानतळ पोलीसांनी गणेश अमरसिंह ठाकूरवर तामील केली आहे.
समाजात अशांतता पसरविणारा गुन्हेगार गणेश ठाकूर आता हद्दपार