पोलीस अधिक्षक कार्यालयात अचानकच मोर्चा घेवून पोहचल्याने धावपळ

नांदेड(प्रतिनिधी)-19 फेबु्रवारी रोजी खून झालेल्या अनिल शेजुळे संदर्भाने आज त्यांच्या वडीलांसह कांही गावकरी मंडळींनी अचानकच पोलीस अधिक्षक कार्यालयात घोषणा देत आत येण्याचा प्रयत्न केला. पण पोलीसांनी लगेच हस्तक्षेप करून त्यांचा हा प्रकार थांबवला.
आज दुपारी 12 वाजेच्यासुमारास चिखली (बु) ता.जि.नांदेड येथील मुरलीधर लक्ष्मण शेजुळे आणि कांही गावकरी मंडळी अनिल शेजुळेच्या मारेकऱ्यांना फाशी द्या अशी घोषणा करत एक बॅनर हातात घेवून पोलीस अधिक्षक कार्यालयात आत येण्याचा प्रयत्न केला. अचानक झालेल्या या प्रकरणामुळे पोलीस अधिक्षक कार्यालयाच्या गेटवरील सुरक्षा रक्षक एकटाच त्यांच्यासमोर आला. पण घोषणाबाजी आत पोहचली. तेंव्हा स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक द्वारकादास चिखलीकर, विष्णुकांत गुट्टे, भगवान धबडगे यांच्यासह अनेक पोलीस अधिकारी आणि पोलीस अंमलदार त्वरीत गेटकडे धावले.
तेथे झालेल्या चर्चेनुसार मुरलीधर शेजुळे आणि त्यांच्यासोबतचे गावकरी मंडळी असे सांगत होते की, शिवाजीनगर पोलीसांना वारंवार भेटून आम्ही निवेदन दिले. यातील एक मारेकरी अद्याप पकडला नाही. खरे तर या प्रकरणातील फिर्यादीनेच अनिल शेजुळेचा खून नियोजित केलेला आहे यासाठी न्याय मिळावा. तेंव्हा पोलीसंानी त्यांना समजून सांगितले की, या प्रकरणातील एक फरार आरोपी चिंग्या उर्फ संतोष तरटे या अटक झाली आहे आणि इतर आक्षेपांबाबत आम्ही योग्य चौकशी करू. त्यानंतर जमाव शांत झाला आणि कांही निवडक लोकांना पोलीसांनी आत नेले आणि त्यांची भेट वरिष्ठ अधिकाऱ्यांशी घडवून दिली.
या प्रकरणात मुरलीधर लक्ष्मण शेजुळे यांनी 20 फेबु्रवारी रोजी असा अर्ज केला होता की, या प्रकरणातील अनिल शेजुळेच्या मृत्यूनंतर खूनाची तक्रार देणारा राजकुमार एकनाथ शेजुळे हाच या गुन्ह्याचा मागचा सुत्रधार आहे. तरीपण यात कांही प्रक्रीया पुढे झाली नाही. या तक्रारीत असलेल्या नावांपैकी निलेश रावसाहेब गोरठेकर, राहुल नागनाथ काळे, रोहित उर्फ चिंग्या सुभाष मांजरमकर आणि योगेश उर्फ गोट्या चंदर कांबळे या चार जणांना 24 तासातच अटक झाली होती. या प्रकरणातील एकूण 6 आरोपींची नावे लिहिलेली आहेत. त्यातील चिंग्या उर्फ संतोष तरटे यास पोलीसांनी काल रात्री अटक केली आहे. अजुनही एक आरोपी सदरातील गुन्हेगार पोलीसांना पकडायचा आहे. या मोर्चामुळे वजिराबाद चौकात बराच वेळ ट्राफिकीचा खोळंबा पण झाला होता.
