नांदेड(प्रतिनिधी)- 40 हजारांची लाच स्विकारणारा महसुल सहाय्यक यास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने आज जेरबंद केले आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार एका तक्रारदाराने 22 फेब्रुवारी रोजी अर्ज दिला होता की, न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे त्यांची जमीन त्यांची पत्नी व मुलांच्या नावावर फेरफार करून देण्याचा आदेश संबंधीत तलाठी यास देण्यासाठी भोकर तहसील कार्यालयातील महसुल सहाय्यक उल्हास मधुकरराव जवळेकर (46) हे 50 हजार रुपयांची लाच मागत आहेत. या लाचेच्या मागणीची पडताळणी 25 फेब्रुवारी रोजी करण्यात आली. त्यात तडजोडीनंतर लाचेची रक्कम 40 हजार रुपये ठरली आणि आज 28 फेब्रुवारी रोजी लाचेचे 40 हजार रुपये उल्हास मधुकरराव जवळेकर यांनी स्विकारल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्यांना गजाआड केले आहे. त्यांच्या विरुद्ध भोकर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.
पोलीस अधिक्षक राहुल खाडे, अपर पोलीस अधिक्षक धर्मसिंग चव्हाण, पोलीस उपअधिक्षक राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपअधिक्षक अशोक इप्पर, पोलीस अंमलदार संतोष शेटे, एकनाथ गंगातीर, ईश्र्वर जाधव, मारोती सोनटक्के, शेख मुजीब यांनी पार पाडली.