चंद्रसेन देशमुख विरुध्द शेख जाकीरचा अर्ज
नांदेड(प्रतिनिधी)-अर्धापूर निवडणूक संपताच कोणाच्या तरी दुर्देवाने नगरसेवक पद जिंकलेल्या आणि आता फक्त माहिती अधिकार कार्यकर्ता तसेच व्हिसलब्लोअर (खबऱ्या) राहिलेल्या शेख जाकीर शेख सगीरने पुन्हा एकदा अर्जांचा धंदा सुरू केला आहे. नांदेड शहरातील पोलीस उपअधिक्षक चंद्रसेन जगदेवराव देशमुख यांची पदोन्नती तात्काळ रद्द करून नवीन पोलीस उपअधिक्षक नांदेड शहराला द्यावा अशी मागणी करणारा अर्ज महामहिम राज्यपाल ते पोलीस अधिक्षक नांदेड अशा सात जणांना दिला आहे. आता आपल्या जीवनातील घटनाक्रमाचे आत्मपरिक्षण करण्याची वेळ चंद्रसेन देशमुख यांच्यावर आहे. याच शेख जाकीरविरुध्द गुन्हा दाखल न व्हावा यासाठी त्यांनी भरपूर प्रयत्न केलेले आहेत.
अगोदर माहिती अधिकार संरक्षण समितीचा संस्थापक अध्यक्ष, नंतर माहिती सेवा समितीचा संस्थापक अध्यक्ष, सामाजिक कार्यकर्ता, आता नवीन नावे नगरसेवक, माहिती अधिकार कार्यकर्ता आणि व्हिसलब्लोअर (खबऱ्या) अशी नावे लावून शेख जाकीरने एक अर्ज 22 फेबु्रवारी 2022 तारीख लिहिलेला अर्ज प्राप्त झाला आहे. या अर्जावर महामहिम राज्यपाल, मुख्यमंत्री, गृहमंत्री, पोलीस महासंचालक, प्रधानगृहसचिव, विशेष पोलीस महानिरिक्षक, पोलीस अधिक्षक अशा लोकांची नावे लिहिलेली आहेत. व्हिसलब्लोअर या शब्दाचा अर्थ गुगलमध्ये तपासला असता एखाद्या बेकायदेशीर कामाची माहिती संस्थेला अथवा सक्षम व्यक्तीला देणारा व्यक्ती अशी लिहिलेली सापडला. ग्रामीण भाषेत या शब्द रचनेला खबऱ्या असे म्हणतात.
या अर्जामध्ये चंद्रसेन जगदेवराव देशमुख यांच्याविरुध्द त्यांच्या जीवनात घडलेल्या अनेक प्रसंगांचा उल्लेख 9 पानांमध्ये केलेला आहे. असाच एक अर्ज चंद्रसेन देशमुख नांदेडला आले तेंव्हा दुसऱ्या एका खबऱ्याने दिला होता. पण त्यानंतर मी गैरसमजाने अर्ज दिला असे त्या खबऱ्याने लिहुन दिले होते. या 9 पानी अर्जामध्ये सन 2009, 2010 ची कांही प्रकरणे चंद्रसेन देशमुख यांच्याबद्दल लिहिलेली आहेत. हा अर्ज वाचल्यानंतर असे दिसते की, महाराष्ट्र शासनाला कांही कळतच नाही. म्हणून त्यांनी चंद्रसेन देशमुखला अद्याप पदावर ठेवलेले आहे. चंद्रसेन देशमुख गडगंज श्रीमंत आहेत असे ते खाजगीत सांगतात. मग या अर्जात लिहिलेल्या प्रमाणे त्यांना कांही असे करण्याची गरज वाटत नाही.
या अर्जाप्रमाणे असे कांही घडलेही असेल तर त्या संदर्भाने कागदपत्र असतील ते देशमुखांकडे असतील त्यांनी मागे एका खबऱ्याने दिलेल्या अर्जाच्यावेळेस त्या खबऱ्याला बोलावून त्याला ती सर्व कागदपत्रे दाखवली होती म्हणे आणि म्हणूनच त्या खबऱ्याने मी गैरसमजातून अर्ज दिला असे लिहुन दिले होते म्हणे.
व्हिसलब्लोअर असणाऱ्या शेख जाकीर शेख सगीरला अर्धापूर सोबत महाराष्ट्राची चिंता असणे सहाजिकच आहे. कारण अर्धापूर-औरंगाबाद रस्त्यावरच्या नाक्यावर याने अनेक व्हिसलब्लोअरची कामे केलेली आहेत. त्याच्यासोबत ही कामे करणारा एक देवाघरी गेला आहे. आता नवीन व्हिसलब्लोअर हे नाव वापरून अर्धापूर निवडणूक संपताच हा अर्ज देण्यात आला आहे. पाहु काय निर्णय होता की, कांही दिवसात यालाही गैरसमज होतो? आता चंद्रसेन देशमुख यांनी आपण स्वत: आपल्या जीवनातील घटनाक्रमावर दृष्टीक्षेप करण्याची गरज आहे. कारण कांही महिन्यांपुर्वीच याच शेख जाकीरविरुध्द गुन्हा दाखल करण्याअगोदर अनेक अडचणी यांनी आणलेल्या आहेत. या प्रकरणात व्हिसलब्लोअरला उच्च न्यायालयात जाण्यासाठी नांदेडमधील सुर्याजी पिसाळाने पत पुरवठा केल्याची माहिती खात्रीलायक सुत्रांनी दिली आहे.