नांदेड(प्रतिनिधी)-एका ऊस तोड कामगाराच्या 9 वर्षाच्या बालिकेवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या 75 वर्षीय व्यक्तीला अतिरिक्त सत्र विशेष पोक्सो न्यायाधीश रविंद्र पांडे यांनी 3 वर्ष सक्तमजुरी आणि 2 हजार रोख दंड अशी शिक्षा ठोठावली आहे.
मांडवी पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका महिलेने तक्रार दिली की, ते आणि त्यांचे कुटूंबिय सर्व ऊस तोड कामगार आहेत. नोव्हेंबर 2019 मध्ये त्यांचे पती दुसऱ्या राज्यात ऊसतोडीच्या कामाला गेले होते. ती गावात कापूस वेचण्याच्या कामाला जात असे. दि.14 नोव्हेंबर 2019 रोजी ती महिला सायंकाळी घरी आली तेंव्हा तिची 9 वर्षाची बालिका वाकडे-वाकडे पाय ठेवून चालत असतांना तिने पाहिले. याबाबतचे कारण विचारले असता मला गुप्त ठिकाणी खाज येत आहे असे ती बालिका म्हणाली. आपल्या मामा घरी बोलावून तिने आपली मुलगी अशी का चालत आहे याबाबत विचारणा केली असता मामाने मुलीला विचारले आणि तिने सांगितलेली हकीकत भयंकर आहे. बालिकेच्या सांगण्याप्रमाणे शेजारी राहणारा बुढ्ढा ने मला त्रास दिला असे ती सांगू लागली. त्याने मला सिताफळ देतो म्हणून घरी बोलावले आणि खाली पाडून माझ्यावर लैंगिक अन्याय केला. तिचे अंतरवस्त्र याप्रकरामुळे रक्ताने माकले होते. मांडवी पोलिसांनी महिला पोलीस शिपायासमक्ष हा जबाब नोंदवून घेतला आणि किसन धर्मा मुनेश्र्वर (75) याच्याविरुध्द गुन्हा क्रमांक 75/2019 कलम 376(ए)(ब) आणि बालकांचे लैंगिक अत्याचार प्रतिबंधक अधिनियम 2012 तील कलम 3 आणि 4 नुसार दाखल केला. या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक संतोष केंद्रे यांनी केला.
संतोष केंद्रे यांनी 75 वर्षीय किसन धर्मा मुन्नेश्र्वरला अटक करून सविस्तर तपास करत एक-एक पुरावा जोडून पुराव्याची साखळी तयार करून न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले. न्यायालयात या पोक्सो सत्र खटल्याचा क्रमांक 8/2020 असा आहे. अटक झाल्यापासून किसन मुनेश्र्वरला जामीन मिळाला नाही. या खटल्यात 11 साक्षीदार तपासण्यात आले. उपलब्ध पुरावा आधारे न्यायाधीश रविंद्र पांडे यांनी किशन मुनेश्र्वरला 3 वर्ष सक्तमजुरी आणि 2 हजार रुपये रोख दंड अशी शिक्षा ठोठावली. या खटल्यात सरकार पक्षाची बाजू ऍड. एम.ए.बत्तुला (डांगे) यांनी मांडली. तर मांडवीचे सहाय्यक पोलीस निरिक्षक मल्हारी शिवरकर यांच्या मार्गदर्शनात पैरवी अधिकाऱ्यांचे काम पोलीस अंमलदार शेख खदीर यांनी पुर्ण केले.बालिका सुद्धा आजही बाल गृहात आहे.