नांदेड,(प्रतिनिधी)- देगावचाळीत दोन भावांचा खून करून दोघांना गंभीर जखमी करणाऱ्या घटनेतील दोन आरोपीना वजिराबाद पोलिसांनी पकडले आहे.या गुन्हयात एकूण १० आरोपींची नावे निष्पन्न झाली आहेत.चार जण सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत.अजून एक आरोपी पकडणे शिल्लक आहे.छोट्याश्या कारणावरून दोन कुटुंबाची वाट लागल्याचे ही प्रत्यक्ष घटना आहे.आपल्यात झालेला वाद कुठेतरी पूर्ण विराम लावून थांबवला पाहिजे असा संदेश ही घटना सांगते.
१ मार्च २०२२ रोजी शहरातील देगावचाळीमध्ये सकाळी कचरा टाकण्याच्या कारणावरून दोन कुटूंबात भांडण झाले. त्यात चाकूने वार करून प्रफुल्ल दिगंबर राजभोज आणि संतोष दिगंबर राजभोज (३३) या दोन बंधूंचा खून झाला. याच प्रकरणात संदीप दिगंबर राजभोज हा तिसरा भाऊ (२७) आणि त्यांचा मित्र राहुल संजय धोंगडे (१८) हे दोन जण गंभीर जखमी झाले. हा प्रकार पहाटे 4 वाजता घडला.
वजिराबाद पोलीसांनी या प्रकरणी खून आणि जिवघेणा हल्ला अशा सदरात गुन्हा दाखल करून विश्र्वजित मधुकर राजभोज (२७), मधुकर निवृत्ती राजभोज (६७), अभिजित मधुकर राजभोज(३०) आणि अनिल वाढवे (३५) अशा चार जणांना अटक केली. या गुन्ह्याचा तपास पोलीस निरिक्षक जगदीश भंडरवार यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरिक्षक शिवराज जमदडे यांच्याकडे देण्यात आला.सध्या हे चार जण न्यायालयीन कोठडीत अर्थात तुरुंगात आहेत.
आज पोलीस उप निरीक्षक प्रवीण आगलावे,पोलीस अंमलदार अनिल भद्रे,आरलूवाड यांनी देगाव चाळ खून प्रकरणातील महेंद्र तुळशीराम राजभोज (३८) आणि चंद्रपाल मधुकर राजभोज (३५) अश्या दोघांना लालवाडी परिसरातून पकडले आहे.वजिराबाद पोलीस पथकाचे पोलीस अधीक्षक प्रमोद कुमार शेवाळे,अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे, स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर, वजिराबादचे पोलीस निरीक्षक जगदीश भंडरवार यांनी कौतुक केले आहे.खात्री लायक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या दुहेरी खून प्रकरणातील चार आरोपी पकडणे शिल्लक आहे.
एका छोट्याश्या कारणाने आपण जीवन कसे उध्वस्त करून घेतो हे पाहायचे असेल तर देगाव चाळीत घडलेल्या या दुहेरी खून प्रकरणाला पाहायला हवे.दोन भाऊ मरण पावले,तिसरा जखमी आहे,एक मित्र जखमी आहे.आरोपी झालेल्या कुटुंबात चार बंधू आहेत.एक मित्र आहे.म्हणूनच विचारवंत सांगतात की, आपसात वाद होऊ शकतात पण त्या वादांवर कुठेतरी पूर्ण विराम लावणे आवश्यक असते असता असे घडते जे देगाव चाळीत घडले आहे.