नांदेड(प्रतिनिधी)-एका विवाहितेचा पाठलाग करून तिला नेहमी त्रास दिल्या कारणाने या २५ वर्षीय विवाहितेने आत्महत्या केली. रामतिर्थ पोलीसांनी महिलेला त्रास देणार्यास अटक केल्यानंतर आज ७ मार्च रोजी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालय बिलोली यांनी त्यास तीन दिवस पोलीस कोठडीत पाठविले आहे.
रामतिर्थ पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणार्या एका २५ वर्षीय विवाहितेचा पाठलाग एक २५ वर्षीय व्यक्ती करत होता. या महिलेने माझ्याशी संपर्कात यावे अशी त्याची इच्छा होती. पण तिने प्रतिसाद दिला नाही. तरीही या माणसाने माझा तुझ्यावर जीव जडला आहे. मला एकांतात भेट असे सांगून तिचा नेहमी छळ केला. या सर्व त्रासाला कंटाळून या विवाहितेने २८ फेबु्रवारी रोजी आपल्या घरात विष प्राशन केले. पण उपचारादरम्यान तिच्या २ मार्च रोजी मृत्यू झाला.
याबाबत नातेवाईकांनी दिलेल्या तक्रारीनुसार नायगाव तालुक्यातील परमेश्वर काळसे हा युवक जबाबदार असल्याचे सांगितले. रामतिर्थ पोलीसांनी याबाबत गुन्हा दाखल केला.गुन्ह्याचा तपास रामतिर्थचे सहाय्यक पोलीस निरिक्षक विजय जाधव यांच्याकडे देण्यात आला. ६ मार्च रोजी विजय जाधव आणि त्यांच्या सहकारी पोलीस अंमलदारांनी परमेश्वर काळसेला अटक केली. आज दि.७ मार्च रोजी बिलोली न्यायदंडाधिकारी न्यायालयात परमेश्वर काळसेला हजर केल्यानंतर तीन दिवस पोलीस कोठडीत पाठविले आहे.