
नांदेड(प्रतिनिधी)-बेघर पत्रकारांच्या भुखंड घोटाळ्यात महानगरपालिकेने एक जाहीर प्रगटन काढून आपली जबाबदारी संपली असे दाखवत हात झटकले आहेत. तसेच या प्रकरणात कॉंगे्रसच्या नगरसेवकाने दिलेल्या अर्जाचा पाठपुरावा होत नसल्याने हे काम आता थंडावले आहे. त्या बेघर पत्रकारांच्या सोसायटीमध्ये आजच्या परिस्थितीत एका भुखंडावर सुरक्षा भिंत बांधण्याचे काम अत्यंत द्रुतगतीने सुरू आहे. ही सुरक्षा भिंत मद्यविक्रेते आणि मोठे व्यापारी सुरेश राठोड यांच्यावतीने बांधली जात असल्याचे या सोसायटीतील शेजाऱ्यांनी सांगितले.
पत्रकार सहवास को.ऑप.हाऊसिंग सोसायटी स्थापन करून 1982 मध्ये आम्ही बेघर पत्रकार आहोत असे दाखवून महानगरपालिकेची असदुल्लाबाद येथील गट क्रमांक 1 आणि 2 मधील दोन एकर जमीन या बेघर पत्रकारांनी लाटली होती. आज या पत्रकार सहवास को.ऑप.हाऊसिंग सोसायटी असे असले तरी पुर्वी या सोसायटीचे नाव वेगळेच होते. नंतर ते बदलून घेण्यात आले. 36 भुखंड असलेल्या या सोसायटीमध्ये अनेक जण पत्रकार या सज्ञेत बसतच नाहीत. पुढे महानगरपालिकेने भाडे करार करून ही जागा बेघर पत्रकारांना दिली. त्यानंतर जमीनीचे भाव दर दिवशी वाढत गेले आणि आपल्याला 50 हजार रुपयांमध्ये मिळालेले भुखंड बेघर पत्रकारांनी 80 लाख ते 1 कोटीमध्ये विकले. मुळ सदस्यांना वगळून नवीन सदस्य घेतले. त्यातील कांही जणांचा तर आता मृत्यूही झालेला आहे. अशा प्रकारे ही सोसायटी आपली गंगाजळी कशी वाढवता येईल यासाठी प्रयत्न करत होती.
सन 2019 मध्ये लेखापरिक्षकांनी केलेले या बेघर पत्रकारांच्या सोसायटीचे लेखा परिक्षणमधील काही कागदपत्र प्राप्त झाले आणि त्यात अनेक दोष दाखवलेले आहेत. ते दोष दुरूस्त करावेत अशी सुचना लेखा परिक्षकाने केलेली आहे. या बेघर पत्रकारांच्या सोसायटीमध्ये एक भुखंड प्रेमला सुरेश राठोड यांच्या नावाने आहे. त्याचा भुखंड क्रमांक 19 असा आहे. जो 50.4 फुट लांब आणि 61 फुट रुंद असल्याचे दिसते. हा भुखंड स्वातंत्र्य सैनिक कॉलनीस लागून असल्याचे कागदपत्रात नमुद आहे. त्या ठिकाणी बांधकाम करण्यासाठी परवानगी पण मागण्यात आली. पण ती मिळाली की नाही याबद्दल कांही कागदपत्र प्राप्त झाले नाहीत. सोबतच या भुखंडावर बांधकाम करण्यासाठी कर्ज काढायचे आहे असे पत्र प्रेमला सुरेश राठोड यांनी 21 फेबु्रवारी 2019 रोजी दिले होते. तसेच साल सन 18-19 चा कर रुपये 11 हजार 339 रुपये भरलेली पावती सुध्दा या बेघर पत्रकारांच्या सोसायटीतील कागदपत्रे माहिती अधिकारात घेतली होती. तेंव्हा प्राप्त झाली आहेत.
आज दि.8 मार्च 2021 रोजी सकाळी बेघर पत्रकारांच्या सोसायटीमध्ये फेरफटका मारला तेंव्हा त्या ठिकाणी एका भुखंडावर अत्यंत द्रुतगतीने सुरक्षा भिंत बांधण्याचे काम सुरू असल्याचे दिसले. याबाबत तेथील शेजाऱ्यांना माहिती विचारली तेंव्हा मदीरा(दारु) विक्रेता, तांडा बारचे मालक सुरेश राठोड यांचे हे काम असल्याचे त्यांनी सांगितले. अशा प्रकारे बेघर पत्रकारांच्या सोसायटीमध्ये आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांच्या घराचेच बांधकाम सुरू आहे असे नाही तर सुरेश राठोड या मात्तब्बर व्यक्तीचे सुध्दा बांधकाम सुरू असल्याचे तेथील लोक सांगतात.
सप्टेंबर 2021 मध्ये कॉंगे्रस नगरसेवक मुन्तजिबोद्दीन यांनी या बेघर पत्रकारांच्या भुखंड घोटाळ्याची चौकशी करण्याचा अर्ज दिला होता. त्यानंतर सोसायटीला कागदोपत्री आम्ही कार्यवाही केल्याचे दाखवले जात आहे. नगरसेवक मुन्तजिबोद्दीन यांचा पाठपुरावा सुध्दा आत कमी झाला असल्याचे त्या सोसायटीतील बेघर पत्रकार सांगत आहेत. भविष्यात त्यांना या प्रकरणी गैरसमज होवू नये म्हणजे झाले. या सर्व प्रकारामुळे नांदेडच्या सर्व सामान्य नागरीकाच्या मालकीची दोन एकर जागा बेघर पत्रकारांनी धंदा करून इतरांना विक्री केली आहे. हे सिध्दच झाले.तरीपण महानगरपालिकेने ही जागा परत घेण्यासाठी कोणतीच कार्यवाही केलेली नाही.