नांदेड(प्रतिनिधी)-दाभाडी ता.वसमत जि.हिंगोली येथील एका निरक्षर शेतकऱ्याचे पूत्र लोकसेवा आयोगाच्या परिक्षेत उत्तीर्ण होवून पोलीस उपनिरिक्षक पद मिळविण्यात यशस्वी झाले आहेत. आपल्याला मार्गदर्शन कमी असले तरी आपल्या स्वत:च्या इच्छेच्या जोरावर आपण जिंकू शकतो हे या परिक्षेत उत्तीर्ण झालेल्या राहुल भागवतराव दळवी यांनी दाखवून दिले आहे.
वसमत तालुक्यातील अत्यंत छोट्याशा दाभाडी येथे जन्म घेतलेल्या राहुल दळवी यांनी आपले प्राथमिक शिक्षण घेत पदवी शिक्षण पुर्ण केले. त्यानंतर स्पर्धा परिक्षांमध्ये त्यांनी नांदेडला राहुल अभ्यास केला. त्यांचे वडील भागवतराव दळवी हे फक्त शेतकरी होते आणि ते निरक्षर असल्याने अभ्यासाबद्दल जास्त कांही ते सांगू शकत नव्हते. तरी सुध्दा राहुल दळवीने आपल्या मेहनतीच्या दमावर आणि स्वत: शोध घेवून मिळवलेल्या मार्गांच्या आधारावर लोकसेवा आयोगाची परिक्षा उत्तीर्ण करतांना लेखी, शारिरीक आणि मुलाखत या तिन्ही परिक्षांमध्ये एकूण 254 गुण प्राप्त केले आणि महाराष्ट्रात त्यांचा 38 वा गुणवत्ता क्रमांक आला आहे.
मी लहान असतांना मी अनुभवलेले त्रास मी पाहिले आहेत. त्यातून मार्ग काढत मी आज पोलीस उपनिरिक्षक पद प्राप्त केले आहे. या पदाच्या माध्यमातून मला ज्या प्रकारचा त्रास पाहावा लागला तसा इतर कोणाला होणार नाही यासाठी मला जे कांही प्रयत्न करता येतील ते मी करणार आहे असे राहुल दळवी यांनी सांगितले. त्यांच्या या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
निरक्षर शेतकरी पुत्र पोलीस उपनिरिक्षक बनला