नांदेड(प्रतिनिधी)-सगरोळीच्या रेती घाटावर नऊ जणांनी येथील कांही लोकांना मारहाण करून 2 लाख रुपयांची बॅग आणि 10 हजार रुपये किंमतीचा मोबाईल असा 2 लाख 10 हजारांचा ऐवज लुटून नेला. याप्रकरणी बिलोली पोलीसांनी चार जणांना अटक केल्यानंतर बिलोलीचे प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी राजेश पत्की यांनी दोन दिवस पोलीस कोठडीत पाठविले आहे. या प्रकरणातील दोन जण फरार आहेत.
बेटमोगरा ता.मुखेड येथील रहिवासी सय्यद मौलाना ईस्माईल यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 8 मार्चच्या रात्री 11 ते 11.30 वाजेच्यासुमारास मांजरा नदीतील सगरोळी रेती घाट येथे 6 जण आले आणि त्यांनी सय्यद मौलाना ईस्माईल यांना आणि त्यांच्या सहकाऱ्यांना लोखंडी रॉडने मारहाण करून त्यांच्याकडील 2 लाख रुपये रोख रक्कम असलेली बॅग आणि दहा हजार रुपये किंमतीचा एक मोबाईल असा 2 लाख 10 हजार रुपयंाचा ऐवज लुटून नेला आहे. सय्यद मौलाना ईस्माईल यांनी आपल्या तक्रारीत गजानन दामोदर पांचाळ, आनंद नामदेव कोरे, ऋषीकेश गोगरोड, अविनाश भुमन्ना डोपोड, विकास पालकर आणि लिंबुराम ठकरोड अशा 7 नावांसह इतर तीन जण होते असे लिहिले आहे.
बिलोली पोलीसांनी याबाबत गुन्हा क्रमांक 56/2022 कलम 395, 397, 294 भारतीय दंड संहितेप्रमाणे दाखल केला. या गुन्ह्याचा तपास पोलीस निरिक्षक शिवाजी डोईफोडे यांच्याकडे आहे. आज दि.10 मार्च रोजी पोलीस निरिक्षक शिवाजी डोईफोडे आणि त्यांच्या इतर पोलीस अंमलदारांनी पकडलेले दरोडेखोर गजानन दामोदर पांचाळ, आनंद नामदेव कोरे, ऋषीकेश गोगरोड, अविनाश भुमन्ना डोपोड या चार जणांना न्यायालयासमक्ष हजर करून पोलीस कोठडीची मागणी केली. न्यायालयाने पोलीसांची विनंती न्या.राजेश पत्की यांनी दोन दिवसांसाठी मान्य करत या चारही जणांना १२ मार्च 2022 पर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे.
सगरोळीच्या रेतीघाटावर दरोडा टाकणाऱ्या चौघांना पोलीस कोठडी