नांदेड,(प्रतिनिधी)- सन 2014 मध्ये राजुरा प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्याला मारहाण करणाऱ्याला मुखेड अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एन.पी.त्रिभुवन यांनी 1 वर्ष सक्त मजुरी आणि दोन हजार रुपये रोख दंड अशी शिक्षा ठोठावली आहे.
मुखेड न्यायालयात चाललेल्या सत्र खटला क्रमांक 82/2019 नुसार दि.22 फेबु्रवारी 2014 रोजी सकाळी 9 वाजता प्राथमिक आरोग्य केंद्र राजुरा ता.मुखेड येथे दत्ता शिवाजी मामीलवाड (40) हे व्यक्ती आले आणि तेथील वैद्यकीय अधिकारी डॉ.रमेश किशन गवाले यांना म्हणाले तु माझ्या नातेवाईकांचा उपचार लवकर का केला नाहीस यावर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी दत्ता मामीलवाडला समजविण्याचा प्रयत्न केला. पण गोंधळ घालणाऱ्या दत्ता मामीलवाडने अत्यंत अश्लील शिवीगाळ करून डॉ.गवाळे यांचा शर्ट पकडून त्यांना मारहाण केली. मुक्रामाबाद पोलीसांनी या प्रकरणी गुन्हा क्रमांक 19/2014 कलम 353, 332, 294, 506 भारतीय दंड संहितेनुसार दाखल करून त्याचा तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक व्यंकट रामराव गिते यांच्याकडे दिला. गिते यांनी याबाबत वैद्यकीय अधिकाऱ्याला मारहाण करणारा दत्ता मामीलवाड यास अटक करून त्याच्याविरुध्द न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले.
न्यायालयात सत्र खटला क्रमांक 82/2019 मध्ये सरकारी वकील ऍड. सोमनाथ वरपे यांनी सरकार पक्षाची बाजू अत्यंत भक्कमपणे न्यायालयात मांडली. पैरवी अधिकारी पोलीस अंमलदार हणमंत कोंकटवार यांनी त्यांना मदत केली. याबाबत न्यायालयाने उपलब्ध पुराव्या आधारे दत्ता मामीलवाडला डॉ.रमेश गवाले यांना मारहाण केल्याप्रकरणी दोषी मानले आणि त्यांना एक वर्ष सक्तमजुरी आणि दोन हजार रुपये रोख दंड अशी शिक्षा ठोठावली.न्यायालयात या कामगिरीसाठी मेहनत करणाऱ्या बबन कोंकटवार यांचे देगलूर येथील पोलीस उपअधिक्षक सचिन सांगळे, सहाय्यक पोलीस निरिक्षक संग्राम जाधव, पोलीस उपनिरिक्षक गोपीनाथ वाघमारे, गजानन कागणे यांनी कौतुक केले आहे.
प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यास मारहाण करणाऱ्यास सक्तमजुरी