
नांदेड(प्रतिनिधी)-फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेला सुरू झालेला रंगांचा उत्सव पाच दिवस चालत असतो. रंगांमुळे इंद्रधनुष्यपण तयार होता आणि कधी-कधी रंगांचा बेरंगपण होतो. रंगांच्या या उत्सवातून आनंद मिळवतांना आपण कोण आहोत याचा विसर कधी-कधी पडतो. असाच प्रत्यय नांदेड पोलीस परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरिक्षक निसार तांबोळी यांना पाहून आला.
यंदाच्या फाल्गुन शुध्द पौर्णिमा दि.17 मार्च रोजी होलीका दहन करण्यात आले. दुसऱ्या दिवशी दि.18 मार्च हा दिवस धुळवड म्हणून साजरा झाला. नांदेड जिल्ह्यात आणि संपूर्ण परिक्षेत्रात धुळवड सण उत्साहात पार पडला. या सणांच्या उत्सवात जनतेला त्रास होवू नये म्हणून आपल्या मनातील सुप्त भावना दाबून ठेवत पोलीसंाना मात्र रस्त्यावरच उभे राहावे लागते. त्यामुळे समाजात अशांतता निर्माण करणारी तत्वे आपोआप गायब होतात. तरीपण नांदेड शहरात धुळवड सणाच्या शेवटच्या सत्रात फायरींग झाली. त्याचे सर्व सत्य समोर येईल. कारण जखमी अद्याप दवाखान्यात आहेत. त्याच्या पायाला आणि हाताला गोळ्या लागल्या आहेत. नांदेड शहर आणि जिल्ह्याचे काम जिल्हा पोलीस पाहते. त्यासाठी ते सर्व काल दिवसभर रस्त्यावरच होते. असाच कांहीसा प्रकार इतर जिल्हे लातूर, परभणी आणि हिंगोली या पोलीसांचा पण कामाचा भाग होता. या सर्व चार जिल्हा पोलीसांचे नियंत्रण नांदेड येथील विशेष पोलीस महानिरिक्षक कार्यालयात बसून पोलीस उपमहानिरिक्षक निसार तांबोळी यांना नियंत्रणात ठेवायचा असतो. त्यासाठी ते दिवसभर कार्यालयातच हजर होते आणि प्रत्येक जिल्ह्याची माहिती घेवून त्यांना योग्य सुचना देत होते.
आपल्यावरची जबाबदारी पुर्ण करतांना धुळवडीच्या शेवटच्या सत्रात आपण सुध्दा या सणाचा आनंद सहकुटूंब घ्यावा अशी एक मनात इच्छा निसार तांबोळींनाही होती. पण बोलून दाखवता येत नाही हेही त्यांना सांभाळायचे होते. पोलीस महानिरिक्षक कार्यालयातील त्यांचे दररोजचे सहकारी कर्मचारी यांनी हळूच आपल्या साहेबांकडे विचारणा केली की, होळी खेळूया पण आपला हा विचार निसार तांबोळी यांना सांगितला आणि आपल्या मनातील लपलेल्या इच्छेला त्यांनी होकरार्थी बदलले. यावरून आम्हाला आदरणिय मौलाना वहिदोद्दीन खान यांची आठवण झाली. त्यांनी आम्हाला एकदा मुलाखत देतांना सांगितले होते की, प्रेमाचा भाव जोडून माझ्या अंगावर कोणी चिखल लावणार असेल तरीपण तो मी लावून घेईल तेंव्हा रंगांचे काय.
निसार तांबोळी यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना दिलेल्या होकाराची अंमलबजावणी त्वरीत झाली. निसार तांबोळी त्यांच्या सुविद्य पत्नी आणि पुत्र आपल्या सोबत काम करणाऱ्या पोलीसांसोबत रंग खेळतांना असे जाणवत होते की, या रंगांमध्ये तुकारामाच्या अभंगाचा रंग आहे, आई जिजाऊच्या प्रेरणेचा रंग आहे, छत्रपती शिवरायांच्या विचारांचा रंग आहे, माता सावित्रीच्या त्यागाचा रंग आहे, महात्मा फुलेच्या शिक्षणाचा रंग आहे, डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रज्ञा शिल करुणेचा रंग आहे, गाडगेबाबांच्या स्वच्छतेचा रंग आहे, महामाहीम डॉ.अब्दुल कलमांच्या मिसाईलचा रंग आहे, बसवेश्र्वरांच्या प्रभावाचा रंग आहे, आहिल्याबाई होळकरांच्या पराक्रमाचा रंग आहे यासोबतच माणसात माणुस असावा असाही रंग आहे. अशा पध्दतीने साजऱ्या झालेल्या या रंगोत्सवाची माहिती लिहितांना मला एका विचारवंतांचे शब्द आठवतात तो म्हणतो की, “मैने ए जाना था की, अल्फाज मेरे गुंगे है पर सुना है पढने वालो के दिल में बहुत शोर करते है।’.