नांदेड(प्रतिनिधी)-14 एप्रिल 2018 रोजी बोरगाव (ह) ता.हदगाव येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती मिरवणूकीवर हल्ला करून डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या फोटो फाडणाऱ्या आणि मिरवणूकीतील महिलांचे चित्रीकरण करणाऱ्या 19 जणांना अतिरिक्त सत्र न्यायाधीश संजय बांगर यांनी अनेक कलमान्वये शिक्षा ठोठावली आहे. तीन वर्ष सक्तमजुरी आणि प्रत्येकाला 19 हजार रुपये रोख दंड ठोठावण्यात आला आहे. 19 जणांचा मिळून एकूण दंड 3 लाख 61 हजार रुपये होतो.
दि.14 एप्रिल 2018 बोरगाव हस्तरा ता.हदगाव येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती मिरवणूक सुरु असतांना गावातील कांही युवक मिरवणूकीतील महिलांचे व्हिडीओ चित्रीकरण करत असल्याची बाब मिरवणूकीतील लोकांच्या लक्षात आल्यावर त्यांना प्रतिबंध करण्यात आला तेंव्हा गावातील लोकांनी त्यांच्यावर हल्ला करून त्यांना मारहाण केली. यात बरेच लोक जखमी झाले. या मिरवणूकीत डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो फाडण्यात आला होता. तो जप्त करण्यात आला होता. बोरगाव येथील संभा गौतम कदम यांनी याबाबत तक्रार दिली. त्यात जवळपास 22 जणांची नावे होती. त्या सर्वांनी लाथा बुक्यांनी आणि दगडांनी अनुसूचित जातीच्या महिला आणि पुरूषांवर हल्ला केला होता असे तक्रारीत लिहिलेले आहे. संभा कदम यांच्या तक्रारीवरुन हदगाव पोलीसांनी गुन्हा क्रमांक 69/2018 भारतीय दंड संहितेच्या कलम 324, 323, 143,147, 148, 295 आणि अनुसूचित जाती जमाती अत्याचारास प्रतिबंध अधिनियम सुधारीत 2015 मधील कलम 3(1) (आर)(एस.)(टी) प्रमाणे दाखल केला. तत्कालीन पोलीस उप अधीक्षक डी.एम.वाळके यांनी या प्रकरणातील आरोपींना अटक करून न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले. घटना घडली तेंव्हा घटनेतील कांही आरोपी अल्पवयीन होते म्हणून त्यांचा खटला वेगळा झाला.
नांदेड येथील जिल्हा न्यायालयात विशेष ऍट्रॉसिटी खटला 26/2018 मध्ये भागवत लक्ष्मण कदम (22), अभय उर्फ अक्षय प्रभाकर साळुंके (20), अभिलाश शिवाजी साळुंके (23), आशिष शिवाजी साळुंके (25), विकास उर्फ विवेकानंद पंजाबराव साळुंके (21), सदानंद पंजाबराव साळुंके (20) , उमेश भिमराव साळुंके उर्फ देशमुख (19), गजानन व्यंकटे साळुंके (26), अमोल राजाराम साळुंके (23), शरद राजाराम साळुंके (21), अक्षय उर्फ आकाश पांडूरंग हेंद्रे (19), शाम काशिनाथ साळुंके (20), सुरज दत्ताराव चंद्रवंशी (20), नागेश भिमराव देशमुख (22), पंडीत गणपतराव साळुंके (35), गजानन मारोती साळुंके (27), ओमकार रावसाहेब कदम (21), स्वप्नील रमेश कदम (28) आणि देवानंद पंजाबराव साळुंके (19) या 19 जणांनी पद्माबाई दत्ता कदम, सुरज संजू कदम, अजय दिगंबर कदम, बाबाराव गौतम कदम, संभा गौतम कदम यांना मारहाण करून जखमी केले होते. अश्या वेगवेगळ्या कलमांखाली दि.7 फेब्रुवारी 2019 रोजी दोषारोप तयार झाला.
या खटल्यात घटनेतील जखमी, वैद्यकीय अधिकारी, घटनास्थळ पंच असे 9 साक्षीदार न्यायालयात तपासण्यात आले. उपलब्ध पुरावा आधारे न्यायाधीश संजय बांगर यांनी 19 जणांना 14 एप्रिल 2018 रोजी महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती मिरवणूकीत केलेल्या कृत्यांसाठी दोषी मानले. न्यायाधीश संजय बांगर यांनी ऍट्रॉसिटी कायद्याच्या कलम 3(1) (आर), कलम 3(1)(टी) या दोन कलमांसाठी प्रत्येकाला तीन वर्ष सक्त मजुरी आणि प्रत्येक कलमांसाठी प्रत्येकाला 5 हजार रुपये रोख दंड, कलम 323, 143, 147, 148, 504 या पाच कलमांसाठी प्रत्येकाला 6 महिने सक्त मजुरी आणि प्रत्येकाला 1 हजार रुपये रोख दंड, कलम 324 आणि 395 साठी दोन वर्ष सक्तमजुरी आणि प्रत्येकास दोन्ही कलमांसाठी प्रत्येकी 2 हजार रुपये असा दंड ठोठावला. 19 आरोपींना ठोठावलेल्या दंडाची एकूण रक्कम प्रत्येकासाठी 19 हजार रुपये होते. म्हणजे एकूण झालेला दंड 3 लाख 61 हजार रुपये आहे. या सर्व शिक्षा आरोपींना एकत्रीत भोगायच्या आहेत. या खटल्यात सरकार पक्षाची बाजू ऍड.यादव तळेगावकर यांनी मांडली. हदगावचे पोलीस निरीक्षक हणमंत गायकवाड यांच्या मार्गदर्शनात पोलीस अंमलदार संतोषी देशमुख यांनी पैरवी अधिकाऱ्याची भुमिका बजावली. या खटल्यात आरोपींच्या वतीने ऍड. मिलिंद एकताटे यांनी काम पाहिले.