नांदेड,(प्रतिनिधी)-तीन वर्षापूर्वी एका युवकाचा खून केल्यानंतर फरार असलेल्या तीन जणांना शिवाजीनगर पोलिसांनी पकडले. आज २१ मार्च रोजी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी आर.पी.घोले यांनी पकडलेल्या तीन जणांना २३ मार्चपर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे.
आनंदा गुणाजी किरकन यांनी दिलेल्या तक्रारीनुसार १६ एप्रिल २०१९ रोजी रात्री नऊ वाजेच्या सुमारास माझा मुलगा सदाशिव उर्फ सदा किरकन उर्फ देशमुख हा आपल्या मित्रासोबत बाबानगर येथील आपल्या निवासस्थानाच्या खोलीकडे जात असताना अवधूत गणपती खानसोळे, राम गणपती खानसोळे, योगेश चंदेल, गौरव लाला, साईसिंग लाला, ओमसिंग लाला, गणेश चंदेल, निखिल चंदेल आणि हिरासिंग चंदेल या सर्वांनी रस्त्यात थांबवून सदाशिव उर्फ सदाला मारहाण केली त्यात त्यांनी लोखंडी रॉडचा उपयोग केला. मारहाण करण्र्यामध्ये अवधूत गणपती खानसोळे हे सदा उर्फ सदाशिवचे भावजी आहेत. मारहाणच्या भितीने त्यावेळी सदाशिव उर्फ सदा सोबत असलेले त्याचे मित्र पळून गेले. त्यानंतर सदाला मारहाण करुन तसेच सोडून मारेकरी मंडळी निघून गेली. त्यानंतर त्याच्या मित्रांनी त्याला दवाखान्यात आणले. मारहाणीनंतर तीन तासात अर्थात १७ एप्रिल २०१९ रोजी रात्री दोन वाजेच्या सुमारास सदा उर्फ सदाशिवचा मृत्यू झाला. यावरुन शिवाजीनगर पोलिसांनी गुन्हा क्र.१३९/२०२१ दाखल केला. पोलिसांनी त्वरित प्रभावाने तीन जणांना पकडले होते. काल दि.२० मार्च रोजी या प्रकरणातील तीन वर्षापासून फरार आरोपी निखिल सुरेशसिंह चंदेल (२२) रा.बाबानगर नांदेड आणि योगेश बंकटसिंह चंदेल (३४) आणि त्याचा भाऊ गणेश बंकटसिंह चंदेल (२८) दोघे रा.रामनगर जुनाकौठा नांदेड अशा तिघांना पकडले.
या खुनाच्या गुन्ह्याबाबत शिवाजीनगर पोलिसांनी अगोदर तीन जणांविरुध्द न्यायालयात दोषारोपपत्र सादर केलेले आहे. आता पकडलेल्या तिघांविरुध्दचा तपास पोलीस निरीक्षक डॉ.नितीन काशीकर यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक रवी वाहुळे यांच्याकडे देण्यात आला. आज दि.२१ मार्च रोजी रवी वाहुळे यांनी पकडलेल्या तिघांना प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयात हजर केले. तपासासाठी पोलीस कोठडी मागितली. न्यायाधीश आर.पी.घोले यांनी तिघांना २३ मार्चपर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे.