उच्च न्यायालयाने 5 लाख 50 हजार रुपये भरून घेतल्यानंतर सुध्दा अटकपुर्व जामीन नाकारला
नांदेड(प्रतिनिधी)-भ्रष्टाचाराचे वृत्त घेतल्याचे जगाला दाखवून, उच्च न्यायालयात तुमच्याविरुध्द जाईल असे अर्ज देवून समाजासाठी चांगले काम करणाऱ्या दत्तात्रय अनंतवारला उच्च न्यायालयाने जामीन नाकारल्यानंतर मनाठा पोलीसांनी 21 मार्चच्या रात्री इटारसी रेल्वेस्थानकावरून दत्तात्रय अनंतवारला ताब्यात घेतले. उच्च न्यायालयाने 5 लाख 50 हजार रुपये जिल्हा न्यायालय नांदेड येथे भरल्यानंतर अनंतवारला अंतरीम जामीन दिला होता. आज दि.23 मार्च रोजी हदगाव न्यायालयातील प्रथमवर्ग न्यायदंडाधि श्रीमती एस.जी.पांडे यांनी सरकारी जमीनी विक्री करणाऱ्या अनंतवारला दोन दिवस पोलीस कोठडीत पाठविले आहे.
सन 2021 च्या शेवटच्या सत्रात बरड शेवाळा येथील भारतबाई सुभाष पवार यांनी पोलीस ठाणे मनाठा येथे तक्रार दिली की, भ्रष्टाचाराविरुध्द लढण्यात गुणवंत असलेल्या, माहिती अधिकारात अनेकांची दुकाने उघडी करणाऱ्या दत्तात्रय पांडूरंग अनंतवारने बरड शेवाळा गावातील भुखंड क्रमांक 58 ज्याचे क्षेत्रफळ 1050 चौरस फुट आहे. तो भुखंड गाव नमुना क्रमांक 8 मध्ये बनावटपणे आपला दाखवून दत्तात्रय अनंतवारने 4 लाख 50 हजार रुपयांचा विक्री केला. मुळात ती जागा सरकारच्या मालकीची गायरान जमीन आहे. यानुसार मनाठा पोलीसांनी गुन्हा क्रमांक 150/2021 भारतीय दंड संहितेच्या कलम 420, 465, 467, 468 आणि 471 नुसार दाखल केला. या गुन्ह्याचा तपास नांदेड जिल्ह्यातील सर्वात जास्त कर्तव्यदक्ष अपर पोलीस अधिक्षक विजय कबाडे यांच्या अत्यंत काटेकोर मार्गदर्शनात मनाठ्याचे सहाय्यक पोलीस निरिक्षक विनोद चव्हाण यांनी सुरू केला.
दत्तात्रय पांडूरंग अनंतवार या सामाजिक जडण घडणीत अत्यंत वेगवानपणे कार्यरत असणाऱ्या व्यक्तीने अगोदर नांदेड जिल्हा न्यायालयात अटकपुर्व जामीन अर्ज सादर केला. नांदेड न्यायालयाने तो जामीन अर्ज फेटाळून लावला. त्यानंतर उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ औरंगाबाद येथे अपील करण्यात आले. त्याचा क्रमांक 25/2022 असा आहे. बरेच दिवस या प्रकरणाची सुनावणी न्यायमुर्ती आर.जी. आवचट यांच्या न्यायालयात सुरू होती. दरम्यान न्यायालयाने गुन्हा क्रमांक 150 मध्ये फसवणूकीची रक्कम 4 लाख 50 हजार आणि त्यावर काय रक्कम भरता अशी विचारणा केल्यानंतर दत्तात्रय अनंतवार यांनी 5 लाख 50 हजार रुपये भरण्याचे न्यायालयासमक्ष सादरीकरण केले. न्यायालयाने ही विनंती मान्य केली. त्यानुसार दत्तात्रय अनंतवार यांनी 5 लाख 50 हजार रुपये नांदेड जिल्हा न्यायालयात भरले.
यानंतर विजय कबाडे यांच्या अत्यंत काटेकोर आणि कुशल आणि सक्षम मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरिक्षक विनोद चव्हाण यांनी उच्च न्यायालयात आपले म्हणणे सादर केले. उच्च न्यायालयातील सरकारी वकील ऍड.गिता चव्हाण यांनी पोलीसांची बाजू मांडतांना दत्तात्रय अनंतवार हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा व्यक्ती असल्याचे सादरीकरण केले. 4 लाख 50 हजार रुपये घेवून शासनाच्या मालकीची जमीन विक्री करणे हा आर्थिक गुन्ह्याचा पण प्रकार असल्याचे सांगितले. दत्तात्रय अनंतवार यांच्यावतीने पी.आर.कातनेश्र्वरकर यांच्यामार्फत ऍड.ए.एस.जाधव यांनी बाजू मांडली आणि सदर प्रकार हा दिवाणी स्वरुपाचा आहे. उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार 5 लाख 50 हजार रुपये भरलेले आहेत. त्यामुळे पोलीस कोठडीतील तपासाची या गुन्ह्यात गरज नाही असे सांगितले. युक्तीवाद ऐकून आर.जी. आवचट यांनी 5 लाख 50 हजार रुपये भरून अंतरिम अटकपुर्व जामीन दिला होता. तो अंतिम निर्णयात रद्द ठरविला. दत्तात्रय पांडूरंग अनंतवार यांनी भरलेले 5 लाख 50 हजार रुपये गुन्हा क्रमांक 150 चा अंतिम निर्णय येईपर्यंत फिक्स डिपॉझिटमध्ये जमा ठेवण्याचे सांगितले. खटल्यातून अनंतवारची र्निदोषमुक्तता झाली तरी जमा असलेले 5 लाख 50 हजार रुपये भारतबाई सुभाष पवार यांना देण्याचे आदेश दिले आहेत.
अंतिरिम अटकपुर्व जामीन नाकारल्यानंतर दिल्लीकडे जाणाऱ्या एका रेल्वे गाडीत अत्यंत बिनदासपणे अनंतवार रवाना झाल्याची खात्रीलायक माहिती पोलीस विभागाला मिळाल्यानंतर अपर पोलीस अधिक्षक विजय कबाडे यांच्या सक्षम नेतृत्वात क्षणक्षणाची माहिती कबाडे यांना देत मनाठ्याचे सहाय्यक पोलीस निरिक्षक विनोद चव्हाण आणि त्यांचे सहकारी 21 मार्च रोजी इटारसी रेल्वे स्थानकावर पोहचले. नांदेडहून निघालेली गाडी इटारसी रेल्वेस्थानकात आल्याबरोबर दत्तात्रय अनंतवारचा ताबा मनाठा पोलीसांनी मिळवला. त्यानंतर 22 मार्च रोजी इटारसीच्या प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी कृतीकासिंह यांच्यासमोर प्रवास कोठडी मागण्यात आली. ती मंजुर झाली. 22 मार्च रोजी रात्री मनाठा पोलीस पुन्हा नांदेड जिल्ह्यात आले आणि दत्तात्रय पांडूरंग अनंतवार या सामाजिक व्यक्तीला अटक झाली.
आज 23 मार्च रोजी सहाय्यक पोलीस निरिक्षक विनोद चव्हाण आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी दत्तात्रय पांडूरंग अनंतवारला हदगाव न्यायालयात हजर केले. हदगाव न्यायालयातील सरकारी वकील ऍड. गिरीश मोरे यांनी शासकीय जमीन विक्रीचे प्रकरण असल्याचे गांभीर्य न्यायालयासमक्ष मांडले. युक्तीवाद ऐकून न्यायाधीश श्रीमती एस.जी. पांडे यांनी दत्तात्रय पांडूरंग अनंतवारला दोन दिवस,अर्थात २५ मार्च २०२२ पर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे.
सामाजिक कार्यकरत आपले जीवन चालवणाऱ्या दत्तात्रय पांडूरंग अनंतवारसह असंख्य लोक या क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांच्या चांगल्याकामाची दखल घेतली पाहिजे. आणि त्यांना सुध्दा या क्रमात प्रशासनाने आणले पाहिजे. नाही तर नांदेड जिल्हा प्रशासनात कांही लुचपट अधिकारी असेही आहेत की, या सामाजिक काम करणाऱ्यांनी अर्ज दिल्याबरोबर कांही सेकंदांमध्ये त्यावर पृष्ठांकन होते आणि काही तासातच तो अर्ज कार्यवाहीसाठी रवाना होतो.एवढेच नव्हे तर अशा सामाजिक आणि व्हिसल ब्लोअर लोकांसोबत नांदेडचे जिल्हा दंडाधिकारी सुध्दा फोटो काढून घेतात. यानंतर वास्तव न्युज लाईव्हने बातम्या लिहिल्या तर बातम्यांमुळे आमचे जीवन काटेरी झाले असा कांगावा केला जातो. सत्य लिहिण्यासाठीच आम्ही जन्म घेतला आहे आणि आम्ही सत्यच लिहिणार आहोत.