
नांदेड,(प्रतिनिधी)- येथील खंडेलवाल रेस्टॉरंटच्या मालकांनी न्यायालयात विवाहितेच्या तक्रारी प्रकरणात प्रवासा पुरता अटक पूर्व जामीन अर्ज नांदेडच्या जिल्हा न्यायालयात दाखल केला आहे. दिनांक २४ मार्च रोजी त्या अर्जावर सुनावणी आणि निर्णय होण्याची शक्यता आहे.
आज प्राप्त झालेल्या माहितीनुसार नांदेड जिल्हा न्यायालयात निखिल कैलास शर्मा उर्फ खंडेलवाल (३७),निहाल कैलास शर्मा उर्फ खंडेलवाल (३९) आणि नीलम निहाल शर्मा उर्फ खंडेलवाल (३६) रा.वजिराबाद नांदेड यांनी किरकोळ फौजदारी अर्ज क्रमांक २५७/२०२२ दाखल केला आहे.ज्यामध्ये आम्ही अत्यंत साधे सरळ व्यक्ती आहोत.पण निखिलच्या पत्नीने आपल्या माहेरी बार्शी जिल्हा सोलापूर येथे आमच्या विरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम ४९८,(अ),५०४,५०६ आणि ३४ नुसार गुन्हा दाखल केला आहे.बार्शी हे गाव नांदेड पासून २७५ किलोमीटर आहे असे तक्रारीत लिहिलेले आहे. गुगल नकाशावर हे अंतर पहिले असता २३५ किलोमीटर दाखवते.तेथे जाण्यासाठी आणि कायदेशीर प्रक्रिया करण्यासाठी आम्हाला १५ दिवसांचा अटकपूर्व जामीन द्यावा अशी मागणी या अर्जात करण्यात आलेली आहे.सोबतच आम्ही न्यायालयाच्या सर्व निर्देशांचे पालन करू,साक्षीदारांना हॅम्पर आणि टॅम्पर करणार नाही अशी ग्वाही या अर्जात लिहिलेली आहे.
याबाबत कायद्याची माहिती घेतली तेव्हा अनेक विधिज्ञांनी सांगितले की भारतीय दंड संहितेच्या कलम ४९८ प्रमाणे गुन्हा दाखल झाला असेल तर पोलीस आरोपीना अटकच करीत नाहीत. तेव्हा अटकपूर्व जामीन मागण्याचा प्रश्नच कसा काय आला हे विधिज्ञांना सुद्धा समजत नाही आहे.या अर्ज क्रमांक २५७ ची सुनावणी दिनांक २४ मार्च २०२२ रोजी होणार आहे.या संदर्भाने न्यायालयाने वजिराबाद पोलिसांकडून म्हणणे (से) मागितला असल्याची खात्रीलायक माहिती आहे.