नांदेड(प्रतिनिधी)-25 मार्च रोजी वजिराबाद भागात पडलेले लिंबाचे झाड पडलेले नसून ते पाडण्यात आलेले आहे. याबाबत चौकशी करून दोषींवर कार्यवाही करावी असा अर्ज पर्यावरण प्रेमी ऍड.दिपक शर्मा यांनी दिला आहे.
25 मार्च रोजी सायंकाळी 7 वाजेच्यासुमारास वजिराबाद भागात जवळपास 100 वर्ष जुने असलेले लिंबाचे झाड ऐन गर्दीच्यावेळी पडले. त्यामुळे रस्त्यावर जाणारे-येणारे नागरीक त्याच्याखाली आले. त्यात एक महिला जखमी झाली. पण जनतेने आपले ताकतीची एकजुट दाखवत झाडाला आधार करून महिलेला बाहेर काढून घेतले. झाड पडल्याने अनेक दुचाकी वाहनांचे नुकसान झाले. त्यानंतर तयार झालेल्या परिस्थितीत वजिराबाद पोलीसांनी भरपूर मेहनत घेतली. रातोरात पडलेल्या झाडाला कापून त्याच्या अनेक फांद्या घेवून जाण्यात आल्या.
शनिवारी सकाळी या पडलेल्या झाडाचे एक मोठे खोड तेथे होते. ते रविवारी सुध्दा दिसत होते. या झाडाचे निरिक्षण करून पर्यावरण प्रेमी ऍड.दिपक शर्मा यांनी वजिराबाद पोलीस ठाण्यात अर्ज दिला आहे की, या झाडाला कट रचून पाडण्यात आले आहे. ते झाड पडावे म्हणून त्याच्या मुळांमध्ये ऍसीड (स्लोपॉयझन) पेरण्यात आले होते आणि त्यामुळेच हे झाड पडलेले नसून पाडण्यात आलेले आहे.
कोण आहे हा खलबतकार त्याला शोधून, झाडाची रासायनिक तपासणी करून त्यात ऍसीड असेल तर नक्कीच हा डाव आहे आणि हा डाव कोणाचा आहे, कोणी खलबत रचले, कोणी अंमलात आणले या सर्वांचा शोध घेवून दोषीवर कार्यवाही करावी असा अर्ज ऍड.दिपक शर्मा यांनी दिला आहे.
वजिराबादमधील पडलेले झाड पडले नाही तर पाडण्यात आले; पर्यावरण प्रेमी ऍड.दिपक शर्मा यांचा अर्ज