नांदेड,(प्रतिनिधी)- आश्वासित प्रगती योजनेच्या पूर्ततेसाठी राज्यातील सर्व पोलीस घटकांमध्ये पोलीस उप निरीक्षक पदासाठी तीन निकष पूर्ण करणाऱ्या सहायक पोलीस उप निरीक्षकांना ग्रेड पीएसआय असे संबोधन देण्याची कार्यवाही तात्काळ करावी असे आदेश आस्थापना विभागाचे अपर पोलीस महासंचालक संजीव कुमार सिंघल यांनी जारी केले आहेत.
२५ फेब्रुवारी २०२२ रोजी राज्य शासनाने दिलेल्या आदेशानुसार ३० वर्ष पोलीस सेवा पूर्ण केलेल्या सहायक पोलीस उप निरीक्षकांना ग्रेस पीएसआय असे संबोधन द्यायचे आहे.त्यासाठी सहायक पोलीस उप निरीक्षक पदावर तीन वर्ष सेवा पूर्ण केलेले,पोलीस उप निरीक्षक वेतन श्रेणी प्राप्त झालेले अश्या प्रकारे तीनही निकष पूर्ण करणारे राज्यातील सर्व सहायक पोलीस उप निरीक्षक आता ग्रेड पीएसआय संबोधले जाणार आहेत.
अश्या सर्व सहायक पोलीस उप निरीक्षकांना श्रेणी पोलीस उप निरीक्षक (ग्रेड पीएसआय) करण्याची कार्यवाही राज्यातील सर्व पोलीस घटक प्रमुखांनी तात्काळ पूर्ण करावी असे आदेश अपर पोलीस महासंचालक संजीव कुमार सिंघल यांनी दिनांक २८ मार्च २०२२ रोजी दिले आहेत.या आदेशाच्या प्रति पोलीस आयुक्त बृहन्मुंबई,सर्व पोलीस आयुक्त लोहमार्ग सह,सर्व पोलीस अधीक्षक लोहमार्ग सह,सर्व विशेष पोलीस महानिरीक्षक आणि पोलीस उप महानिरीक्षक यांना पाठवण्यात आल्या आहेत.
या आदेशाने राज्यातील जवळपास ४००० सहायक पोलीस उप निरीक्षक आता श्रेणी पोलीस उप निरीक्षक (ग्रेड पीएसआय) होणार आहेत. राज्य सरकारने पोलीस दलातील पोलीस नाईक हे पद आता रद्द केले आहे.त्यामुळे आपल्या पोलीस सेवाला १० वर्ष पूर्ण करणारे हजारो पोलीस शिपाई आता पोलीस हवालदार बनणार आहेत.पोलीस शिपाई हि पदे मोठ्या प्रमाणात रिक्त होणार आहेत.तेव्हा पोलीस दलात भरती होण्याची इच्छा ठेवणारे अनेक जण आपले स्वप्न पूर्ण करू शकतील.