नांदेड(प्रतिनिधी)-सन 2009 मध्ये मारहाण करणाऱ्या दोन जणांना मुख्य न्यायदंडाधिकारी एस.ए.खलाने यांनी तीन वर्ष शिक्षा आणि प्रत्येकी 6 हजार रुपये रोख दंड अशी शिक्षा ठोठावली आहे. 13 वर्षानंतर हा निकाल आला.
दि.5 जानेवारी 2009 रोजी दुपारी 2 वाजेच्यासुमारास वसंतनगर भागातील कुष्ठरोग कार्यालयासमोरून भगवान हनुमंत देशमुख (60) रा.विवेकनगर नांदेड हे आपल्या दुचाकीवर जात असतांना अविनाश नारायण देशमुख (21) आणि प्रदीप नारायण देशमुख (28) या दोघांनी त्यांना खाली पाडले आणि आपल्या हातातील पंचने त्यांना मारहाण केली. त्यात त्यांना गंभीर दुखापत झाली. याबाबत भगवान हनुमंतराव देशमुख यांच्या तक्रारीवरुन शिवाजीनगर पोलीसांनी गुन्हा क्रमांक 05/2009 भारतीय दंड संहितेच्या कलम 324, 325, 323, 504 आणि 506 नुसार दाखल केला. या गुन्ह्याचा तपास पोलीस हवालदार रमेश जाधव यांनी करून अविनाश आणि प्रदीप देशमुख या दोन भावांविरुध्द न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले. न्यायालयात या प्रकरणी आठ साक्षीदारांनी आपले जबाब नोंदवले. उपलब्ध पुरावा आधारे मुख्य न्यायदंडाधिकारी एस.ए.खलाने यांनी भगवान देशमुखांना मारहाण केल्याप्रकरणी अविनाश आणि प्रदीप देशमुख या दोन बंधूंना दोषी जाहीर करून त्यांना तीन वर्ष शिक्षा आणि प्रत्येकी 6 हजार रुपये दंड अशी शिक्षा ठोठावली. या खटल्यात सरकार पक्षाची बाजू ऍड. जोहिरे यांनी मानली. शिवाजीनगरचे पोलीस निरिक्षक डॉ.नितीन काशीकर यांच्या मार्गदर्शनात पैरवी अधिकारी म्हणून पोलीस अंमलदार उमेश राठोड आणि महिला पोलीस निकम यांनी काम पाहिले.
13 वर्षापुर्वी मारहाण केलेल्या प्रकरणात दोघांना शिक्षा आणि 6 हजार रुपये दंड